टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे सुपर १२ सामन्यात अतिशय सुमार दर्जाचे प्रदर्शन राहिले आहे. यामुळे भारतीय संघावर चाहत्यांसोबत क्रिकेट विश्लेषकांनी देखील ताशेरे ओढले आहे. यासोबतच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आणि कर्णधार वसीम अक्रम असे म्हटले आहे की, भारताने मर्यादित षटकांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याकडे केलेले दुर्लक्ष, हे सध्याच्या टी-२० विश्वचषकातील खराब कामगिरीचे प्रमुख कारण आहे.
पाकिस्तानचा वसीम अक्रम, ज्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे, त्याने एक मनोरंजक आकडेवारी उघड केली आहे. टी२० विश्वचषकापूर्वी वरिष्ठ भारतीय खेळाडूंनी खेळलेली शेवटची मोठी आंतरराष्ट्रीय मर्यादित षटकांची मालिका मार्चमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळली होती. इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्व भारतीय क्रिकेटपटू प्रामुख्याने भाग घेतात, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्पर्धा करण्यासाठी अशी लीग पुरेशी नसते, अशीही भर त्याने घातली आहे.
अक्रम म्हणाला, ‘भारताने मार्चमध्ये सर्व वरिष्ठ खेळाडूंसोबत शेवटची मर्यादित षटकांची मालिका खेळली होती आणि आता नोव्हेंबर सुरू आहे. यावरून भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गांभीर्याने घेत नसल्याचे स्पष्ट होते. आयपीएलमध्ये खेळणे पुरेसे आहे, असे त्यांना वाटते. जेव्हा तुम्ही लीग क्रिकेट खेळता तेव्हा तुमच्यासमोर विरोधी संघातील एक किंवा दोन चांगले गोलंदाज असतात, पण जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता तेव्हा तुमच्यासमोर पाच चांगले गोलंदाज असतात.’
अक्रमने आणखी एक मुद्दा मांडला, आयपीएलला जाण्यापूर्वी भारताने श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली होती, परंतु त्या संघात वरिष्ठ खेळाडू नगण्य होते, कारण त्यावेळी वरिष्ठ भारतीय खेळाडू इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यात व्यस्त होते.
अक्रमने न्यूझीलंडविरुद्ध नाणेफेक गमावणे हे भारताच्या पराभवाचे मुख्य कारण मानले, परंतु त्याचवेळी रोहित शर्मासारख्या फलंदाजाला तिसऱ्या क्रमांकावर खेळवल्याबद्दल संघाला फटकारले. हा सामना एकतर्फी झाल्याचेही तो म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट कोहलीनंतर भारतीय वनडे संघाच्या कर्णधारपदासाठी ‘हे’ ५ खेळाडू आहेत प्रबळ दावेदार