नागपूर। रणजी ट्रॉफी 2018-19 स्पर्धेचे सध्या उपांत्यपूर्व फेरीतील सामने सुरु आहेत. या फेरीत विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरू असलेल्या विदर्भ विरुद्ध उत्तराखंड सामन्यात विदर्भाने पहिल्या डावात तिसऱ्या दिवसाखेर सहा विकेट्स गमावत 559 धावांचा डोंगर उभा केला आहे. तसेच 204 धावांची आघाडीही घेतली आहे.
या डावात 40 वर्षीय वासिम जाफरने 26 चौकाराच्या मदतीने 296 चेंडूत 206 धावा केल्या आहेत. याबरोबरच त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 19 हजार धावांचा टप्पा पार करण्याचा पराक्रमही केला आहे. हा टप्पा पार करणारा तो पाचवाच भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
या आधी हा टप्पा सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी पार केला आहे.
जाफरचा उत्तराखंड विरुद्धचा सामना हा 251 वा प्रथम श्रेणी सामना आहे. त्याने 251 सामन्यात 19079 धावा केल्या आहेत.
रणजीच्या या हंगामात त्याने 86च्या सरासरीने 969 धावा केल्या आहेत. यामध्ये पाच शतकांचा समावेश आहे. तर मागील तीन डावामध्ये त्याने 98, 178 आणि 126 धावा करत अप्रतिम खेळ केला आहे.
तसेच याच महिन्यात जाफर सर्वाधिक रणजी सामने खेळणारा खेळाडू ठरला होता. त्याचा चालू सामना रणजी ट्रॉफी स्पर्धेतील 147 वा सामना आहे.
प्रथम श्रेणीमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय क्रिकेटपटू –
25834 धावा – सुनील गावसकर (348 सामने)
25396 धावा – सचिन तेंडुलकर (310 सामने)
23794 धावा – राहुल द्रविड (298 सामने)
19730 धावा – व्हीव्हीएस लक्ष्मण (267 सामने)
19079 धावा – वासिम जाफर (251 सामने)
महत्त्वाच्या बातम्या-
–भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी या खेळाडूचे झाले ९ महिन्यांनी न्यूझीलंड संघात पुनरागमन
–मेलबर्नला पोहचताच रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकने पाहिला या खेळाडूचा सामना