कोरोना साथीच्या आजारामुळे बरेच दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले गेले नाही. भारतीय संघ तब्बल 7 महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. 27 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या 3 सामन्यांचा वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला जाईल. यासाठी भारतीय संघातील खेळाडूंनी सरावाला कसून सुरुवात केली आहे.
या दौऱ्यासाठी भारतीय खेळाडूंनी गेल्याच आठवड्यात ऑस्ट्रेलिया गाठले आहे. भारतासाठी हा दौरा खडतर मानला जात आहे. त्याच दृष्टीने खेळाडूंनी सरावही सुरु केला आहे. बीसीसीआय रोज खेळाडूंच्या सरावाचे व्हिडीओही शेअर करत आहे. यातूनच खेळाडूंनी सरावाला किती महत्त्व दिले आहे, हे समजते.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली देखील सरावाच्या वेळी कायम पुढे असतो. यावेळी आयपीएलमध्ये विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला आलेल्या अपयशामुळे तो आणखी जोमाने सराव करताना दिसू शकतो. विराटचे अनेक वेळा सराव करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. परंतू आता विराटनेच या दौऱ्यातील त्याच्या सरावाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
अगदी ऑस्ट्रेलिया गाठताच विराटने फलंदाजीचा सराव सुरू केला आहे. विराटने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून सराव करतानाचा हा व्हिडिओही शेअर केला आहे. त्याचबरोबर त्याने लिहिले की, “मला कसोटी क्रिकेटचा सराव करायला आवडते.”
Love test cricket practice sessions ❤️???? pic.twitter.com/XPNad3YapF
— Virat Kohli (@imVkohli) November 17, 2020
अॅडीलेड येथे होणार्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली भारतात परत येईल. त्याची पत्नी अनुष्का शर्मा गर्भवती आहे. त्यामुळे भारतीय कर्णधार विराट कोहलीने बीसीसीआयकडे पालकत्व रजा मागितली होती आणि भारतीय क्रिकेट बोर्डाने कर्णधार कोहलीच्या रजेला मंजुरी दिली होती.
अजिंक्य रहाणे हा भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आहे, त्यामुळे विराट कोहली ऑस्ट्रेलियाहून परतल्यावर संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे असेल.
मात्र, विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारताला सामना जिंकणे फारच अवघड आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी हा निश्चितच मोठा धक्का आहे.
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना 27 नोव्हेंबरला सिडनी येथे खेळला जाईल. दुसरा वनडे सामना 29 नोव्हेंबरला सिडनी येथे खेळला जाईल. मालिकेचा तिसरा आणि शेवटचा वनडे सामना 2 डिसेंबर रोजी कॅनबरा येथे होणार आहे.
तीन सामन्यांच्या टी -20 मालिकेचा पहिला टी20 सामना 4 डिसेंबर रोजी कॅनबेरा येथे खेळला जाईल. दुसरा टी20 सामना 6 डिसेंबरला सिडनी येथे खेळला जाईल. मालिकेचा तिसरा आणि अंतिम टी20 सामना 8 डिसेंबरला सिडनीच्याच मैदानावर खेळला जाईल.
पहिला कसोटी सामना 17 डिसेंबर ते 21 डिसेंबरदरम्यान अॅडिलेड येथे खेळला जाईल. दुसरा कसोटी सामना 26 डिसेंबर ते 30 डिसेंबरदरम्यान मेलबर्न येथे खेळाला जाईल.तिसरा कसोटी सामना 7 जानेवारी ते 11 जनावरी या कालावधीत सिडनीच्या मैदानावर होईल, तर चौथा आणि अंतिम कसोटी सामना 15 जानेवारी ते 19 जानेवारीदरम्यान ब्रिस्बेन येथे होईल.