पुणे। रविवारी(13 ऑक्टोबर) भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयमवरवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 1 डाव आणि 137 धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबर भारतीय संघाने 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
भारताने ही विजयी आघाडी घेतली असली तरी रांचीमध्ये 19 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटीला हलक्यामध्ये न घेता विजय मिळवून मालिका 3-0 ने जिंकण्याचा प्रयत्न असणार असल्याचे भारताचा कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केले आहे.
दुसऱ्या कसोटीनंतर विराट म्हणाला, ‘कसोटी चॅम्पियनशीपचा विचार केला तर प्रत्येक सामन्याला महत्त्व आहे. मग तो सामना मायदेशातील असो किंवा परदेशातील. त्यामुळे आम्ही तिसऱ्या सामन्याला हलक्यामध्ये घेणार नाही.’
‘कोणीही कोणत्याही स्तरावर कामगिरीत सैलता आणणार नाही. आम्ही तिसऱ्या कसोटीतही जिंकण्यासाठी उतरु आणि आशा आहे की आम्ही 3-0 असा विजय मिळवू.’
विराटला दुसऱ्या कसोटी सामन्याचा सामनावीर पुरस्कारही देण्यात आला. त्याने या सामन्यात नाबाद 254 धावांची द्विशतकी खेळी केली होती. तसेच अजिंक्य रहाणेबरोबर 178 धावांची भागीदारीही केली होती. या भागीदारीबद्दल बोलताना विराट म्हणाला, ‘मला रहाणेबरोबर फलंदाजी करताना मजा येते.’
तसेच यष्टीरक्षक वृद्धिमान साहा आणि आर अश्विनबद्दल विराट म्हणाला, ‘विशाखापट्टणमवरुन(पहिल्या कसोटीनंतर) इथे येताना साहा नर्व्हस होता, पण त्याने या सामन्यात चांगली कामगिरी केली. तसेच अश्विननेही चांगले पुनरागमन केले.’
त्याचबरोबर भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल विराट म्हणाला, ‘जेव्हा आम्ही एक संघ म्हणून 7 व्या क्रमांकावरुन सुरुवात केली होती. त्यावेळी एकच मार्ग होता तो म्हणजे पुढे येत राहणे.आम्ही काही गोष्टी मागे टाकल्या आणि सर्वांना सरावावेळी मेहनत घेण्यास सांगितले.’
‘आम्हाला मागील तीन-चार वर्षात संघात असलेल्या खेळाडूंचा अभिमान आहे. संघातील सर्वांकडे सतत सुधारणा करण्यासाठी असलेली भूक आणि इच्छा पाहून चांगले वाटते.’
भारतीय संघाने फेब्रुवारी 2013 पासून आत्तापर्यंत मायदेशात सलग 11 कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. आत्तापर्यंत कोणत्याही संघाला मायदेशात सलग 11 कसोटी मालिका जिंकता आल्या नव्हत्या.