भारतीय क्रिकेटचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून एमएस धोनी याचेच नाव घेतले जाते. रांचीसारख्या छोट्या शहरातून येत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील यशाची सर्व शिखरे त्याने पादाक्रांत केली. टी20 वर्ल्डकप, वनडे वर्ल्डकप, चॅम्पियन ट्रॉफी या तिन्ही आयसीसी ट्रॉफी जिंकवण्यात आणि टेस्ट रँकिंगमध्ये टीम इंडियाला पहिल्या नंबरवर नेण्यात धोनीच्या नेतृत्वाचा मोठा वाटा होता. धोनीचे नेतृत्व गुण वादातीत होते. मात्र, या सर्वा व्यतिरिक्त त्याचा आणखी एक गुण होता तो म्हणजे संयम. आपल्या संयमाच्या व नेहमी शांत राहून निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे त्याला ‘कॅप्टन कूल’ असेही म्हटले जाते. धोनीला मैदानावर क्वचितच रागवताना पाहिले गेले. आपल्या संघातील खेळाडूंना तो रागावण्यापेक्षा सल्ले देण्यात जास्त धन्यता मानत. खेळाडूंशी नेहमीच सौजन्याने वागणाऱ्या धोनीने पत्रकारांशी मात्र अनेकदा पंगा घेतला होता. त्याने काही वेळा पत्रकारांना त्यांच्या प्रश्नांमध्ये अडकवलेले. तसेच, एखादी गोष्ट त्याला खटकली तर तो स्पष्टपणे पत्रकारांना सुनावतही होता. या लेखातून आपण त्याबाबतच जाणून घेणार आहोत.
एमएस धोनी (MS Dhoni), पत्रकार आणि प्रेस कॉन्फरन्स यांचे खूप जुने नाते आहे. एखाद्या घटनेचे रिपोर्टिंग करताना काही पत्रकार अफवा देखील पसरवत असतात. अशीच एक अफवा 2009 मध्ये पसरलेली. आपल्यापेक्षा ज्युनिअर असलेल्या धोनीला कॅप्टन बनवल्यामुळे वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) नाराज असल्याचे मीडियामधून सांगितले जात होते. संघात धोनी आणि सेहवाग असे दोन गट तयार झाल्याचे म्हटले गेलेले. इंग्लंडमध्ये त्यावेळी टी20 वर्ल्डकप खेळला जाणार होता. त्यासाठी टीम इंडिया इंग्लंडमध्ये पोहोचलेली. टीम इंडियाला आपल्या वर्ल्डकप राखण्याच्या मिशनची सुरुवात बांगलादेशविरुद्ध करायची होती. मॅचच्या दोन दिवस आधी आयोजित केल्या गेलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये धोनीने एक जगावेगळी गोष्ट करून दाखवली. टीम इंडियात फूट पडलेली नाही हे सिद्ध करण्यासाठी त्याने प्रेस कॉन्फरन्सच्या अखेरीस पूर्ण टीमच त्या हॉलमध्ये बोलावली. त्यामुळे सर्व पत्रकारांची बोलती बंद झाली.
सन 2016 एशिया कपमध्ये भाग घेण्यासाठी टीम इंडिया जेव्हा बांगलादेशला निघालेली, तेव्हाची प्रेस कॉन्फरन्सही धोनीने गाजवली. एका पत्रकाराने त्याला रिटायरमेंटविषयी प्रश्न विचारला. धोनी काहीसा रागावलेला दिसला. मात्र, त्याने संयम दाखवण्याचा प्रयत्न केला. त्या प्रश्नाचे उत्तर देताना तो म्हणाला, “एकच प्रश्न तुम्ही आम्हाला दर पंधरा दिवसांनी, महिनाभराने विचारला तर उत्तर बदलणार नाही. प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य आहे याचा अर्थ तुम्ही तेच तेच प्रश्न वारंवार कसे विचारता?” या उत्तरानंतर अनेक पत्रकारांनी आपले पुढील प्रश्न विचारण्याचे देखील थांबवले होते.
धोनी आणि पत्रकार (Dhoni And Journalist) यांच्यातील एक मजेदार व्हिडिओ अनेकांनी पाहिला असेल. 2016 टी20 वर्ल्डकप सेमी फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर धोनी प्रेस कॉन्फरन्समध्ये आला होता. अनेक प्रश्न त्याला विचारले जात होते. अशात ऑस्ट्रेलियन पत्रकार फेरस याने पुन्हा एकदा त्याच्या रिटायरमेंटविषयी प्रश्न केलाच.
त्याने विचारले, “तू आता सर्व काही कमावले आहे. तरीही तू खेळणे कायम ठेवणार का?”
त्यावर धोनीने हसून उत्तर देत म्हटले,
“इकडे या. आपण थोडी मजा करूया.”
त्यावर फेरसला वाटले धोनी आपली गंमत करत आहे. धोनीने शेजारील खुर्ची रिकामी करत फेरसला येण्याची विनंती केली. आयता फुलटॉस मिळाल्यासारखा त्याने फेरसची फिरकी घ्यायला सुरुवात केली. फेरसला शेजारी बसवत त्याने विचारले,
“तुम्हाला वाटते का मी रिटायर व्हावे?” त्यावर फेरसकडून नाही असे उत्तर आले. धोनी पुढे म्हणाला,
“तुम्ही भारतीय असता तर मी तुम्हाला विचारले असते की, तुमचा भाऊ किंवा मुलगा विकेटकीपिंग करतो का?… मला पळताना पाहून तुम्हाला वाटतं का मी अनफिट आहे?” त्यावर पुन्हा फेरसने नकारार्थीच उत्तर दिले. धोनीने शेवटचा डाव धोबीपछाड टाकला आणि विचारले,
“मी 2019 वर्ल्डकपमध्ये खेळू शकेन असे तुम्हाला वाटते का? फेरसने हो म्हणताच धोनी म्हणाला, “बस, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.”
या संभाषणाचा व्हिडिओ आजही युट्यूबवर मोठ्या प्रमाणात पाहिला जातो.
या व्यतिरिक्त धोनीने आपल्या कॅप्टन्सीच्या पहिल्याच वेळी म्हणजे 2007 टी20 वर्ल्डकपवेळी कॉमेंटेटर रवी शास्त्री यांनादेखील हसतमुखाने सुनावलेले. वर्ल्डकप सेमी फायनलमध्ये इंडिया आणि ऑस्ट्रेलिया भिडणार होते. मॅच आधी रवी शास्त्री यांनी ऑस्ट्रेलियाला फेवरेट्स म्हटले. मात्र, सेमीफायनल टीम इंडियाने जिंकली, तेव्हा पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये रवी शास्त्री हेच कॅप्टन धोनीशी बोलणार होते. रवी यांनी प्रश्न विचारण्याआधी धोनीने म्हटले, “बातचीत सुरू करण्याआधी मला एक आठवण करून द्यायची आहे की, मी आणि टीमने तुम्हाला खोटं ठरवलंय, आणि त्यामूळे कदाचित सर्वात जास्त आनंदी तुम्हीच असाल.”
या सर्व उदाहरणांवरून एक दिसून येते धोनीला राग यायचा खरा, पण आपल्या शब्दांची मिठी छुरी चालवत तो पत्रकारांना त्यांच्याच जाळ्यात गुंतवायचा.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
संघ 1, आणि गोलंदाज 11: भारताची क्रिकेटविश्वातील सर्वात दुर्मिळ घटना, प्रत्येक क्रिकेटप्रेमीने वाचाच
दुर्दैवी! दुखापतींमुळे ‘या’ क्रिकेटपटूंच्या करिअरला कायमचा लागला ब्रेक, यादीत एका भारतीयाचाही समावेश