भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा एक यशस्वी कर्णधार आहे. २००८ मध्ये भारतीय १९ वर्षाखालील संघाला विश्वचषक (U-19 World Cup 2008) जिंकून देण्यापासून ते २०२२ मध्ये १०० कसोटी सामने खेळेपर्यंत विराटने अनेक मोठे विक्रम केले आहेत. १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकल्यानंतर त्याने त्याच वर्षी श्रीलंकाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने मागील काळात एकही शतक झळकावलेले नाही. चाहते त्याच्या शतकाची वाट पाहत आहेत. परंतु त्याने अनेक सामन्यांंमध्ये मोठ्या खेळी केल्या आहेत. कोहलीच्या या यशावर त्याचा १९ वर्षाखालील विश्वचषकादरम्यानचा सोबती खेळाडू प्रदीप सांगवानने त्याची प्रशंसा केली आहे.
डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज सांगवान कोहलीबद्दल बोलताना म्हणाला, “आम्हा सर्वांना माहित होते की विराट मोठी शतकी खेळी खेळण्याच्या सवयीमुळे एक दिवस भारतासाठी खेळेल. ही त्याची सुरुवातीपासूनची सवय आहे. तो खुप धावा करायचा आणि त्याने सर्व मोठ्या संघांविरुद्ध उत्तम कामगिरी करुन हे सिद्ध केले आहे”
माजी खेळाडू म्हणाला, “त्याची मानसिकता अशी होती की, जर तो मोठ्या संघांविरुद्ध मोठ्या खेळी खेळला. तर भारतीय संघात त्याला स्थान मिळण्याची शक्यता वाढेल. लोक त्याला विचारतील, त्याच्याबद्दल जाणून घेतील.”
सांगवान म्हणाला, “विराट जेव्हा मैदानात असतो, तेव्हा तो कधीच हार मानत नाही. त्याला वाटते की फक्त मी एकटाच आहे. मला एकट्यालाच सर्वकाही करायचे आहे, मी या जागेचा राजा आहे. मला माझ्या संघासाठी खेळ जिंकायचा आहे. ड्रेसिंग रुममध्ये तो असे खेळाडू शोधतो, जो त्याला विनोद सांगू शकेल. टिप्पणी करु शकेल. तो वातावरण हलके ठेवतो, जे खुप महत्त्वपुर्ण आहे. कारण कधीकधी ड्रेसिंग रुममध्ये तणावपूर्ण वातावरण असते.”
प्रदीप सांगवान शेवटी म्हणाला, “आरसीबी संघाला नेहमीच हा विश्वास होता की, विराट संघासाठी सामने जिंकेल”. प्रदीप सांगवान हा कोहली सोबतच दिल्ली संघासाठी सुद्धा खेळला आहे. सोबतच तो १९ वर्षाखालील संघासोबत खेळत होता. तसेच तो कोलकता नाईट रायडर्स संघासोबत देखील खेळला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
हरभजन की अश्विन, कोणाची गोलंदाजी सर्वात जास्त घातक? दिग्गज फलंदाजाने दिले उत्तर
जडेजाला ‘सर’ टोपणनाव पडण्यामागे धोनीचा मोठा हात, घ्या जाणून संपूर्ण प्रकरण