आयपीएल २०२२ च्या ६२ व्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जवर ७ विकेट्स राखून विजय मिळवला. उभय संघातील हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. सीएसकेने जरी हा सामना गमावला असला, तरी त्यांचा युवा वगवान गोलंदाज मथीशा पथिरानाने जबरदस्त प्रदर्शन केले आणि चांगलीच प्रसिद्धी देखील मिळवली.
मथीशा पथिराना (Matheesha Pathirana) मुळचा श्रीलंकेचा आहे. आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात त्याला खरेदी करण्यासाठी एकही संघ इच्छुक नव्हता आणि तो अनसोल्ड राहिला होता. पण नशीबीची साथ असल्यामुळे त्याने याच हंगामात आयपीएल पदार्पण केले, तेदेखील अगदी थाटात. पदार्पणाच्या सामन्यात मथीशाने ३.१ षटके गोलंदाजी केली आणि यामध्ये २४ धावा खर्च करून दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या.
डावाच्या आठव्या षटकातील पहिल्या चेंडूवर त्याने शुबमन गिलला पायचीत बाद केले. त्यानंतर डावाच्या १४ व्या षटकात हार्दिक पांड्याच्या रुपात दुसरी विकेट घेतली. हार्दिक दीपक हुड्डाच्या हातून झेलबाद झाला. पथिरानाने पदार्पणाच्या सामन्यात ही उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि संघाने त्याच्यावर दाखवलेल्या विश्वासास पात्र देखील ठरला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची खूपच छोटी कारकीर्द आहे. त्याने आतापर्यंत फक्त एक लिस्ट ए आणि ३ टी-२० सामने खेळले आहेत.
दरम्यान, सीएसकेचा वेगवान गोलंदाज एडम मिल्ने स्नायुंच्या दुखापतीमुळे आयपीएल २०२२ हंगामात आर्ध्यातून मायदेशात माघारी परतला. दीपक चाहर देखील दुखापतीमुळे संपूर्ण हंगामात खेळू शकला नाहीये. अशात मिल्नेच्या बदली खेळाडूच्या रूपात सीएसकेने श्रीलंकेच्या या युवा गोलंदाजाला २० लाख रुपयांच्या बेस प्राइसमध्ये संघात सहभागी केले.
दरम्यान, आयपीएल २०२२ च्या आधी जानेवारी आणि फेब्रुवारी माहिन्यात वेस्ट इंडीजमध्ये १९ वर्षाखालील आयसीसी विश्वचषक खेळला गेला. या स्पर्धेत पथिरानाने श्रीलंका संघाचो प्रतिनिधित्व केले होते. त्याची गोलंदाजीची पद्धत बऱ्याच अंशी माजी दिग्गज लसिथ मलिंगाप्रमाणे आहे. मलिंगा डावाच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेण्यासाठी आणि उत्कृष्ट यॉर्कर चेंडूसाठी ओळखला जायचा. पथिरानाने पहिल्याच आयपीएल सामन्यात या दोन्ही गोष्टी साध्य करून दाखवल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
कौतुकास पात्र मथीशा पथीराणाची खुद्द कर्णधार एमएस धोनीकडून स्तुती; म्हणाला, ‘तो दुसरा मलिंगाच’
अभिराम निलाखे, ईशान दिगंबर, सिद्धी खोत, श्रावणी देशमुख यांचा मुख्य फेरीत प्रवेश