भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी (८ डिसेंबर) मोठी घोषणा केली. रोहित शर्मा (rohit sharma) याच्यावर टी२० पाठोपाठ आता वनडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विराट कोहलीला (virat kohli) बीसीसीआयने वनडे कर्णधापदावरून हटवण्याचा निर्णय घेतला. आगामी दक्षिण अफ्रिका दौऱ्यात रोहित वनडे संघाचा कर्णधार असेल. चाहत्यांना बीसीसीआयने घेतलेल्या या निर्णयानंतर अनेक प्रश्न पडले आहेत. काही चाहते असेही आहे, ज्यांना रोहित आणि विराटच्या वार्षिक वेतनाविषयी प्रश्न पडला आहे.
चाहत्यांमध्ये अशी चर्चा सुरू आहे की, नवीन वनडे कर्णधार रोहितचे वार्षिक वेतन विराटच्या वेतनापेक्षा जास्त असणार आहे. तत्पूर्वी, विराटने आधी जाहीर केल्याप्रमाणे टी२० विश्वचषकानंतर त्याने टी२० संघाचे कर्णधारपद सोडले. मात्र, वनडे संघाचे कर्णधापद सोडण्याची इच्छा नसताना त्याला या पदावरून पायउतार होण्याची वेळ आली आहे. या दोन्ही खेळाडूंच्या वार्षिक वेतनाचा विचार केला, तर त्यामध्ये काही फरक असेल असे वाटत नाही.
भारतीय संघातील विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह हे बीसीसीआयच्या वर्षिक कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये ग्रेड ए+ मध्ये सहभागी आहेत. बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्टनुसार ग्रेड ए+ मध्ये सहभागी असलेल्या खेळाडूंना वर्षाला सात करोड रुपये दिले जातात. बीसीसीआय संघाच्या कर्णधारासाठी विषेश वेतन देत नाही. त्याव्यतिरिक्त संघातील इतर ग्रेड ए, बी आणि सी मधील खेळाडूंना अनुक्रमे ५ करोड, ३ करोड आणि १ करोड रुपये वार्षिक वेतन दिले जाते.
आयपीएलमधील या दोन्ही दिग्गजांच्या कमाईचा विचार केला, तर यामध्ये रोहित शर्माने विराटला मागे टाकले आहे. आयपीएल २०२२ साठी मुंबई इंडियन्सने कर्णधार रोहित शर्माला १५ ऐवजी १६ करोड रुपये देऊन रिटेन केले आहे. तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने १५ करोड रुपयांमध्ये विराटला रिटेन केले. याआधी विराटला १७ करोड रुपये दिले जात होते, यावर्षी त्याच्या कमाईत २ करोड रुपयांची घसरण झाली आहे.
रोहित शर्माने आतापर्यंत आयपीएलमध्ये केलेल्या कमाईचा विचार केला, तर त्याने १४६.६ करोड रुपये कमावले आहेत. रोहित एमएस धोनीनंतरचा दुसरा खेळाडू आहे, ज्याने सर्वाधिक कमाई केली आहे. धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत १५० करोड पेक्षा जास्त रुपयांची कमाई केली आहे. तर, कोहलीने आयपीएलमध्ये आतापर्यंत १४३ करोड रुपये कमवले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
“रोहित यावर्षीचा सर्वोत्तम टी२० व कसोटी फलंदाज असेल”
“किती शतकं केली यापेक्षा जेतेपद मिळवणे महत्वाचे”, नवनिर्वाचित कर्णधार रोहितचे वक्तव्य
‘मिशन दक्षिण आफ्रिके’साठी रोहित, रिषभने सुरू केली तयारी; लयीत नसलेल्या रहाणेनेही गाळला घाम