हेमिल्टन। न्यूझीलंडने आज(31 जानेवारी) भारताविरुद्ध चौथ्या वनडे सामन्यात 8 विकेट्स आणि 212 चेंडू बाकी ठेवत विजय मिळवला आहे. याबरोबरच भारताविरुद्ध सर्वाधिक चेंडू बाकी ठेवत वनडे सामना जिंकण्याचाही विक्रम न्यूझीलंड संघाने केला आहे.
याआधी असा पराक्रम श्रीलंका संघाने 2010 मध्ये डम्बुल्ला येथे केला होता. त्यावेळी त्यांनी भारताला 209 चेंडू बाकी ठेवत वनडे सामन्यात पराभूत केले होते.
त्यामुळे 200 पेक्षा अधिक चेंडू बाकी असताना भारताविरुद्ध प्रतिस्पर्धी संघाने विजय मिळवण्याची ही वनडेमधील दुसरी वेळ आहे. तसेच आजचा पराभव हा भारताचा वनडेमधील चेंडूंच्या तूलनेतील सर्वात मोठा पराभव ठरला आहे.
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला योग्य ठरवत न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय संघाचा डाव 30.5 षटकात 92 धावांवर रोखला. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने 5 विकेट घेत मोलाचा वाटा उचलला.
भारताने दिलेले हे 93 आव्हान न्यूझीलंडने 2 विकेट्सच्या मोबदल्यात 14.4 षटकात सहज पार केले. न्यूझीलंडकडून रॉस टेलरने सर्वाधिक नाबाद 37 धावा केल्या.
भारताविरुद्ध प्रतिस्पर्धी संघाने सर्वाधिक चेंडू बाकी ठेवत मिळवलेले विजय-
212 चेंडू – न्यूझीलंड (हेमिल्टन, 2019)
209 चेंडू – श्रीलंका (डम्बुल्ला, 2010)
181 चेंडू – श्रीलंका (हम्बान्टोटो, 2012)
176 चेंडू – श्रीलंका (धरमशाला, 2017)
174 चेंडू – ऑस्ट्रेलिया (सिडनी, 1981)
महत्त्वाच्या बातम्या-
–राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र उपांत्य फेरीत, असे होणार उपांत्य फेरीचे सामने
–धावा केल्या सातच तरी रोहित शर्माने या दिग्गजांच्या यादीत मिळवले मानाचे स्थान
–धोनी नसता तर रोहित कधीच एवढा मोठा खेळाडू होऊ शकला नसता