महिला टी२० वर्ल्डकप: “ऑस्ट्रेलिया प्रबळ दावेदार पण भारतही कमजोर नाही”

आजपासून (21 फेब्रुवारी) ऑस्ट्रेलिया येथे महिला टी20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. या विश्वचषकातील पहिला सामना भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात सिडनी येथे होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरु होणार आहे.

या सामन्यासंदर्भात बोलताना भारताची अनुभवी फलंदाज मिताली राजने ऑस्ट्रेलिया महिला संघाला विजयाचे प्रबळ दावेदार म्हटले आहे. मात्र, हा सामना खूप रोमांचक असेल, असेही ती म्हणाली.

मितालीने आयसीसीच्या एका स्तंभात लिहीले आहे की, ‘ऑस्ट्रेलिया महिला संघ विजयाचा प्रबळ दावेदार असला तरी भारतही कमजोर नाही. ऑस्ट्रेलियाकडे काही प्रतिभावान खेळाडू आहेत आणि मला वाटते की या सामन्यात खूप धावा होतील. त्यामुळे हा सामना खूप रोमांचक असेल.’

मिताली म्हणाली की, “दोन्ही संघांकडे विशेषत: फलंदाजीसाठी काही दमदार खेळाडू आहेत. त्यामुळे सामन्याची हार-जीत ही धावांवर अवलंबून असेल. ऑस्ट्रेलियाने टी20 विश्वचषकात चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे ते भारताविरुद्धचा पहिला सामना जिंकण्याची शक्यता आहे.”

पुढे भारतीय महिला संघातील खेळाडूंची प्रशंसा करत मिताली म्हणाली की, ” अनेक महिला खेळाडू युवा खेळाडूंच्या आदर्श बनल्या आहेत. हा महिला क्रिकेटमध्ये झालेला सर्वात मोठा बदल आहे. ” मितालीने 1999मध्ये क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्यावेळी महिला क्रिकेट अधिक लोकप्रिय नव्हते.

You might also like