पुणे। क्रीडा भारती पुणे महानगरच्यावतीने युवा दौड २०१९चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक २० जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता स.प. महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून मॅरेथॉनला प्रारंभ होणार आहे. प्रत्येकाने मैदानी खेळांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉनमध्ये सर्व वयोगटातील तब्बल ४ हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती स्पर्धा प्रमुख प्रदिप अष्टपुत्रे यांनी दिली आहे.
यावेळी पालकमंत्री गिरीष बापट, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे, पुणे विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, डॉ. शरद कुंटे, अॅड. एस.के. जैन, धनंजय दामले, पी.ए.इनामदार, राजन गो-हे, राजीव सहस्त्रबुद्धे उपस्थित राहणार आहेत. स्पर्धाेचा पारितोषिक वितरण समारंभ त्याच दिवशी सायंकाळी ८.३० वाजता स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. यावेळी मॅरेथॉनमध्ये औद्योगिक क्षेत्रातील कर्मचारी, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचारी असे १२ ते ५५ वयोगटातील स्पर्धक सहभागी होणार आहे. तसेच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी छत्रपती पुरस्कार विजेते, अर्जुन पुरस्कार विजेते असे राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू सहभागी होणार आहेत. विजेत्या धावपटूंसाठी तब्बल २ लाखांची रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
प्रदिप अष्टपुत्रे म्हणाले, युवा दौडमध्ये वयोगटानुसार दिड किलोमीटर, ३ किलोमीटर, ४ किलोमीटर, ६ किलोमीटर, ८ किलोमीटर व १२ किलोमीटर अशा अंतराच्या स्पर्धा होणार आहेत. दिड किलोमीटरसाठी सणस मैदान-अभिनव कॉलेज चौक ते स.प. महाविद्यालय असा मार्ग असणार आहे. ३ किलोमीटरसाठी स.प. महाविद्यालय-अलका टॉकिज चौक-खंडोजीबाबा चौक ते पुन्हा अलका टॉकिज चौक असा असणार आहे.
४ किलोमीटरसाठी स.प. महाविद्यालय- अभिनव महाविद्यालय- नगरकर तालीम चौक- लक्ष्मी रोड-विजय टॉकिज चौक ते पुन्हा अलका टॉकिज चौक असा असणार आहे. ६ किलोमीटरसाठी स.प. महाविद्यालय-अभिनव महाविद्यालय-नगरकर तालीम चौक- लक्ष्मी रोड-विजय टॉकिज-अलका टॉकिज चौक, गुडलक चौक-डेक्कन- खंडोजीबाबा चौक ते पुन्हा अलका टॉकिज चौक असा आहे.
८ किलोमीटरसाठी स.प. महाविद्यालय-अभिनव महाविद्यालय-नगरकर तालीम चौक- लक्ष्मी रोड-विजय टॉकिज-अलका टॉकिज चौक, गुडलक चौक-ज्ञानेश्वर पादुका चौक-म्हसोबा गेट-सिमला ऑफिस-संचेती हॉस्पिटल-जंगली महाराज रोड-बालगंधर्व-ते पुन्हा अलका टॉकिज चौक असा मार्ग असणार आहे.