कालपासून(25 जूलै) ग्लोबल टी20 लीग स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना टोरोंटो नॅशनल्स विरुद्ध व्हँकुव्हर नाइट्स संघात पार पडला. या सामन्यात ख्रिस गेल नेतृत्त्व करत असलेल्या व्हँकुव्हर नाइट्स संघाने 8 विकेट्सने विजय मिळवला.
पण या सामन्यातील टोरोंटो नॅशनल्स कर्णधार युवराज सिंगचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की युवराज नाबाद असतानाही पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. ही घटना टोरोंटो नॅशनल्स संघ प्रथम फलंदाजी करत असताना 17 व्या षटकात घडली.
या षटकात रिझवान चीमा गोलंदाजी करत होता. त्याने या षटकातील टाकलेल्या दुसऱ्या चेंडूवर फटका खेळण्यास युवराज चूकला. त्यामुळे चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन यष्टीरक्षक तोबायस विसेकडे गेला. पण विसेला झेल घेता आला नाही. मात्र चेंडू त्याच्या हाताला लागून स्टंम्पवर पडला आणि बेल्स उडाल्या.
त्यामुळे आपण बाद असल्याचे वाटून युवराज पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र नंतर दाखण्यात आलेल्या रिप्लेमध्ये दिसले की जेव्हा चेंडू स्टंम्पवर पडला तेव्हा युवराजचा पाय क्रिजमध्येच होता. त्यामुळे तो नाबाद होता.
https://twitter.com/ebianfeatures/status/1154586983932366849
युवराज या सामन्यात टोरोंटो नॅशनल्सचे फलंदाज ब्रेंडन मॅक्यूलम(4) आणि कॅलम मॅकलोद(17) बाद झाल्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याने या सामन्यात 27 चेंडूत 14 धावा केल्या.
टोरोंटो नॅशनल्सकडून रॉड्रीगो थॉमसने 31 चेंडूत 41 धावा आणि हेन्रीक क्लासेनने 20 चेंडूत 41 धावांची चांगली खेळी केली. तसेच किरॉन पोलार्डने 13 चेंडूत नाबाद 30 धावांची छोटेखानी आक्रमक खेळी केली. त्यामुळे टोरोंटो नॅशनल्सने 20 षटकात 5 बाद 159 धावा केल्या.
नाईट्स संघाकडून अली खान, अँडिल फेहेलुकवायो, मायकल रिप्पॉन, साद बिन जफर आणि रिझवान चीमा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
त्यानंतर नाईट्स संघाने 160 धावांचा पाठलाग 2 विकेट्सच्या मोबदल्यात 17.2 षटकात सहज पार केला. त्यांच्याकडून चॅडविक वॉल्टन(59) आणि रस्सी वॅन दर दसनने(65) नाबाद अर्धशतकी खेळी केल्या. टोरोंटो संघाकडून मार्क मॉन्टफर्ट आणि जेरेमी गॉर्डनने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–…म्हणून लसिथ मलिंगा घेतोय वनडे क्रिकेटमधून निवृत्ती
–पॅरा रेजिमेंटमध्ये ही जबाबदारी सांभाळणार एमएस धोनी
–प्रो कबड्डीच्या या सामन्यासाठी उपस्थित राहणार टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली






