मुंबई । ‘सिक्सर किंग’ युवराज सिंग विदेशातील टी -20 लीगमध्ये भाग घेणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे. त्याने ग्लोबल टी -20 कॅनडामध्ये भाग घेतला होता आणि आता ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये (बीबीएल) खेळतानाही दिसू शकेल. बीबीएलचा 10 वा हंगाम 3 डिसेंबर ते 6 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. भारतीय खेळाडूला जर विदेशी लीगमध्ये खेळायचे असेल तर त्याला भारतात सर्व प्रकाराच्या क्रिकेटमधून निवृत्त व्हावे लागते. त्यात आयपीएल, देशांतर्गत क्रिकेट व आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा समावेश होतो. युवराजने जून 2019 मध्ये भारतातील सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) एनओसी मिळाल्यानंतर त्याने ग्लोबल टी -20 कॅनडा आणि अबूधाबी टी 10 लीगमध्ये भाग घेतला. यावर्षी कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) मध्येही युवराज सामील होईल असे वाटत होते, पण कोविड -१९ साथीच्या आजारामुळे तो सहभागी होऊ शकला नाही.
युवराजचे मॅनेजर जेसन वॉर्न यांनी ‘द एज’ ला सांगितले की, ‘आम्ही क्रिकेट ऑस्ट्रेलियाबरोबर काम करत आहोत. 2013-14 मध्ये बीबीएलमध्ये भाग घेणारा सचिन तेंडुलकर पहिला भारतीय क्रिकेटपटू होऊ शकला असता, परंतू तो नोव्हेंबर 2013 मध्ये निवृत्त झाला, त्यानंतर सिडनी थंडर संघाने त्यांच्याशी संपर्क साधला, पण चर्चा होऊ शकली नाही.’
युवराजने 2017 मध्ये राष्ट्रीय संघातून वगळल्यानंतर दोन वर्षे इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसला. त्याला 2018 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि 2019 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची फारशी संधी मिळाली नाही. 2019 आयपीएल संपल्यानंतर एका महिन्यानंतर त्याने भारतीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. भारताचा प्रवीण तांबे यंदा सीपीएलचा भाग आहे. तो ट्रिनबागो नाईट रायडर्सकडून खेळत आहे. मनप्रीत गोनी, वीरेंद्र सेहवाग, झहीर खान हेही विदेशी लीगमध्ये खेळले आहेत.