लवकरच भारतात इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धेचा थरार सुरू होणार आहे. या स्पर्धेपूर्वी खेळाडूंचा मेगा लिलाव आयोजित करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी (३० नोव्हेंबर) जुन्या ८ संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये काही दिग्गज खेळाडूंना रिलीज करण्यात आले आहे. तर रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये काही आश्चर्य करणारी नावे देखील आहेत. दरम्यान गेल्या काही वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या युझवेंद्र चहलला देखील आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी रिलीज करण्यात आले आहे. रिलीज केल्यानंतर त्याने ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी सर्व संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलला रिलीज करण्यात आले. बेंगलोर संघाने पुढील हंगामासाठी ३ खेळाडूंना रिटेन केले आहे. ज्यामध्ये १ परदेशी खेळाडूचा समावेश आहे. या संघात विराट कोहलीला १५ कोटी रुपये देऊन रिटेन करण्यात आले आहे. तर ग्लेन मॅक्सवेलला ११ आणि मोहम्मद सिराजला ७ कोटी रुपये देऊन बेंगलोर संघाने रिटेन केले आहे.
बेंगलोर संघाकडे चौथा खेळाडू रिटेन करण्याचा पर्याय होता. परंतु त्यांनी तसे केले नाही. या संघात चहलसह देवदत्त पडीक्कलसारखा फलंदाज देखील होता. दरम्यान चहलला रिलीज केल्यामुळे चाहते देखील निराश झाले आहे. बेंगलोर संघाच्या निर्णयानंतर चहलने एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये त्याने लिहिले की, ‘प्रत्येक गोष्टीसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे आभार!!’ हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
बेंगलोर संघाला आतापर्यंत आयपीएल स्पर्धेचे जेतेपद मिळवण्यात अपयश आले आहे. त्यामुळे पुढील हंगामात हा संघ नवीन खेळाडूंसह मैदानात उतरणार आहे. चहलबद्दल बोलायचं झालं तर त्याने गेल्या काही वर्षांपासून या संघासाठी मोलाचे योगदान दिले आहे. चहलने चिन्नास्वामीच्या खेळपट्टीवर चांगली गोलंदाजी केली आणि याबद्दल त्याचे खूप कौतुकही झाले होते. आयपीएल स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करत त्याने भारतीय संघात देखील स्थान मिळवले होते.