शानदार फॉर्ममध्ये असलेल्या झिम्बाब्वे संघाने आपला धडाका सुरू ठेवला आहे. त्यांनी बांगलादेशला सलग दुसऱ्या सामन्यात पराभूत केले. या विजयासह तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत झिम्बाब्वेने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने ९ बाद २९० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेने ४८ व्या षटकात ५ बाद २९१ धावा करून सामना जिंकला. अष्टपैलू सिकंदर रझाला त्याच्या नाबाद शतकी खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, बांगलादेशचे सलामीवीर तमिम इक्बाल आणि अनामूल हक यांनी पहिल्या गड्यासाठी ७१ धावांची भागीदारी केली. तमीम ५० आणि अनामुल २० धावा करून बाद झाले. त्यानंतर आलेला मुशफिकुर रहीम २५ धावा करू शकला. नजमुल हसनने ३८ धावांचे योगदान दिले. मात्र, महमुदुल्लाहने अखेरपर्यंत नाबाद राहत ८४ चेंडूत ८१ धावा केल्या. अफिफ हुसैननेही ४१ धावा केल्या. बांगलादेशने निर्धारित ५० षटकात ९ गडी गमावून २९० धावा केल्या. झिम्बाब्वेकडून सिकंदर रझाने ३ आणि मधवेरेने २ बळी मिळवले.
प्रत्युत्तरात, यजमान झिम्बाब्वेची सुरुवात अत्यंत खराब झाली. केटानो खाते न उघडता बाद झाला. त्याच्यापाठोपाठ इनोसंट कायाही ७ धावांच्या पुढे जाऊ शकला नाही. त्यानंतर मधेवरे (२) आणि मारुमणी (२५) धावांवर माघारी परतले. त्यावेळी झिम्बाब्वेची अवस्था ४ बाद ४९ अशी झालेली.
त्यानंतर, कर्णधार रेगिस चकाब्वा आणि सिकंदर रझा यांनी पाचव्या गड्यासाठी द्विशतकी भागीदारी करत झिम्बाब्वेच्या आशा पल्लवित केल्या. दोघांनी शतके झळकावली. चकाब्वा ७५ चेंडूत १०२ धावा करून बाद झाला. रझा ११७ धावांवर नाबाद राहिला. मुन्योंगानेही नाबाद ३० धावा केल्याने झिम्बाब्वेने ५ बाद २९१ धावा करून सामना जिंकला. झिम्बाब्वेने २०१३ मध्ये शेवटच्या वेळी बांगलादेशला वनडे मालिकेत पराभूत करण्याची कामगिरी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
CWG 2022 | स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पक्कं केलं पदक, फायनलमध्ये मिळवली जागा
खुद्द पंतप्रधानांनी ज्याचं कौतुक केलं, तो बीड जिल्ह्याचा अविनाश साबळे आहे तरी कोण?
त्याला काय फिरायला आणलंय? वेस्ट इंडिज दौऱ्यावर एका संधीसाठी तरसतोय ‘हा’ टॅलेंटेड भारतीय स्पिनर