भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रविवारी (२४ ऑक्टोबर) हाय व्होल्टेज सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु पाकिस्तान संघातील गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत भारतीय संघावर जोरदार विजय मिळवला. तब्बल १४ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पाकिस्तान संघाने टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघावर विजय मिळवला. या विजयानंतर स्टेडियममध्ये चाहत्यांनी जल्लोष केला. परंतु, बाबर आजमने पाकिस्तानला अतीउत्साही न होण्याचा सल्ला दिला होता. तर स्टेडियम पासून दूर कराचीमध्ये हा विजय जल्लोषात साजरा करण्यात आला.
पाकिस्तानची वृत्तवाहिनी ‘ जियो न्यूज’ ने दिलेल्या माहितीनुसार, कराची स्थित ओरांगी टाऊनच्या सेक्टर ४ मध्ये अज्ञात दिशेने गोळी चालल्याने ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच या विजयाचा जल्लोष थांबवण्यासाठी आलेले सब इन्सपेक्टर अब्दुल गनी देखील गंभीर जखमी झाले. तसेच कराचीमधील आणखी काही लोकांच्या बाबतीत देखील अशीच घटना घडली आहे.
पाकिस्तान संघाने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तान संघाचे कौतुक केले. तर देशाचे गृहमंत्री शेख रशिद यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले की, “पाकिस्तान संघाने पहिल्यांदाच टी२० विश्वचषक स्पर्धेत १० गडी राखून विजय मिळवल्यानंतर भारतीय मुस्लिमांसह जगभरातील सर्व मुस्लिम आनंदोत्सव साजरा करत आहेत. ”
व्हायरल व्हिडिओमध्ये शेख रशिद यांनी म्हटले की, “मला खेद वाटतो की हा पहिला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आहे जो मी माझ्या राष्ट्रीय जबाबदाऱ्यांमुळे मैदानावर पाहू शकलो नाही. पण मी इस्लामाबाद, रावळपिंडीकडे जाणार्या सर्व ट्रॅफिकला कंटेनर हटवण्याचे निर्देश दिले आहेत जेणेकरुन समुदाय एक तारखेला उत्सव साजरा करू शकेल. आज आमच्यासाठी अंतिम सामना होता आणि जगभरातील मुस्लिमांसह भारतातील मुस्लिमांच्या भावना पाकिस्तानी संघासोबत होत्या. सर्व आलमी इस्लामला विजयाच्या हार्दिक शुभेच्छा. पाकिस्तान झिंदाबाद… इस्लाम जिंदाबाद!; ”
या वक्तव्यानंतर अनेक जणांकडून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.