भारतीय कसोटी संघाकडून खेळण्याचे स्वप्न प्रत्येक खेळाडू पाहतो. काहींचे हे स्वप्न पूर्ण होते, तर काहींचे होत नाही. मात्र, भारतीय कसोटी संघाकडून खेळण्याची संधी मिळाल्यानंतर काही खेळाडू या संधीचं सोनंही करतात. आपल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर ते एक- दोन किंवा दहा- वीस नाहीत, तर थेट १०० आणि त्यापेक्षाही अधिक कसोटी सामनेही खेळतात. हा कारनामाही फार क्रिकेटपटूंना जमला नाही. असा कारनामा करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये फक्त ११ खेळाडूंची नावे आहेत. आता यात आणखी एका खेळाडूचे नाव जोडले जाणार आहे. ते म्हणजे किंग कोहली अर्थातच विराट कोहलीचे.
येत्या शुक्रवारपासून (०४ मार्च) भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. हा कसोटी सामना मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या कसोटी सामन्यात पाऊल ठेवताच विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर खास विक्रमाची नोंद होणार आहे. तो भारतीय संघाकडून १०० किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामने खेळणारा १२ वा खेळाडू ठरणार आहे.
विशेष म्हणजे, विराटपूर्वी ११ खेळाडूंनी हा कारनामा केला आहे. कोण होते ते खेळाडू, त्यांनी कोणत्या वयात, कोणत्या मैदानावर आणि कोणत्या साली हा कारनामा केला होता, पाहूया या लेखातून…
भारतीय संघाकडून १०० कसोटी सामने खेळणारे खेळाडू म्हणजे सुनील गावसकर. त्यांनी १९८४ साली लाहोर येथे आपला १०० वा कसोटी सामना खेळला होता. गावसकरांनंतर दिलीप वेंगसरकर यांनी १९८८ साली मुंबई येथे आपला १०० वा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर कपिल देव यांनी १९८९ साली कराचीमध्ये, सचिन तेंडुलकरने २००२ साली ओव्हलमध्ये, अनिल कुंबळेने २००५ साली अहमदाबादमध्ये, राहुल द्रविडने २००६ साली विदर्भमध्ये, सौरव गांगुलीने २००७ साली मेलबर्नमध्ये, व्हीव्हीएस लक्ष्मणने २००८ साली नागपूरमध्ये, वीरेंद्र सेहवागने २०१२ साली मुंबईमध्ये, हरभजन सिंगने २०१३ साली चेन्नईमध्ये आणि ईशांत शर्माने २०२१ साली अहमदाबादमध्ये आपला १०० वा कसोटी सामना खेळला होता.
हे झालं भारतीय खेळाडूंनी आपला १०० वा कसोटी सामना कोणत्या मैदानावर खेळला, त्याची आकडेवारी. आता पाहूया भारतीय खेळाडूंनी आपला १०० वा कसोटी सामना कोणत्या वयात खेळला होता.
वयानुसार भारतीय खेळाडूंच्या १०० व्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर यामध्ये सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर येतो. सचिनने २९ वर्षे आणि १३४ दिवसांच्या वयात आपला १०० वा कसोटी सामना खेळला होता. दुसरा क्रमांक लागतो तो म्हणजे कपिल देव यांचा. कपिल देव यांनी ३० वर्षे आणि ३१३ दिवसांच्या वयात हा कारनामा केला होता. त्यानंतर दिलीप वेंगसरकर यांनी ३२ वर्षे आणि २३२ दिवसांच्या वयात, हरभजन सिंगने ३२ वर्षे आणि २३४ दिवसांच्या वयात, ईशांत शर्माने ३२ वर्षे आणि १७५ व्या वयात, राहुल द्रविडने ३३ वर्षे आणि ६६ दिवसांच्या वयात, विराट कोहलीने ३३ वर्षे आणि १२० दिवसांच्या वयात, वीरेंद्र सेहवागने ३४ वर्षे आणि ३४ दिवसांच्या वयात, व्हीव्हीएस लक्ष्मणने ३४ वर्षे आणि ५ दिवसांच्या वयात, अनिल कुंबळेने ३५ वर्षे आणि ६२ दिवसांच्या वयात, सौरव गांगुलीने ३५ वर्षे आणि १७१ दिवसांच्या वयात आणि सुनील गावसकर यांनी ३५ वर्षे आणि ९९ दिवसांच्या वयात १०० वा कसोटी सामना खेळला होता.
विराटच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत खेळलेल्या ९९ कसोटी सामन्यांमध्ये १६८ डावांमध्ये फलंदाजी करताना ७९६२ धावा कुटल्या होत्या. या धावा करताना त्याने २७ शतके आणि २८ अर्धशतके ठोकली आहेत. विशेष म्हणजे, विराटची आतापर्यंतचा सर्वोत्तम धावसंख्या ही नाबाद २५४ इतकी आहे.
भारताकडून १०० वा कसोटी सामना खेळणारे खेळाडू (वर्ष आणि ठिकाण)
१९८४- सुनील गावसकर (लाहोर)
१९८८- दिलीप वेंगसरकर (मुंबई)
१९८९- कपिल देव (कराची)
२००२- सचिन तेंडुलकर (ओव्हल)
२००५- अनिल कुंबळे (अहमदाबाद)
२००६- राहुल द्रविड (व्हीसीए)
२००७- सौरव गांगुली (एमसीजी)
२००८- व्हीव्हीएस लक्ष्मण (नागपूर)
२०१२- वीरेंद्र सेहवाग (मुंबई)
२०१३- हरभजन सिंग (चेन्नई)
२०२१- ईशांत शर्मा (अहमदाबाद)
२०२२- विराट कोहली (मोहाली)*
भारताकडून १०० वा कसोटी सामना खेळणाऱ्या खेळाडूंचे वय
२९ वर्षे १३४ दिवस- सचिन तेंडुलकर
३० वर्षे ३१३ दिवस- कपिल देव
३२ वर्षे २३२ दिवस- दिलीप वेंगसरकर
३२ वर्षे २३४ दिवस- ईशांत शर्मा
३३ वर्षे ६६ दिवस- राहुल द्रविड
३३ वर्षे १२० दिवस- विराट कोहली*
३४ वर्षे ३४ दिवस- वीरेंद्र सेहवाग
३४ वर्षे ५ दिवस- व्हीव्हीएस लक्ष्मण
३५ वर्षे ६२ दिवस- अनिल कुंबळे
३५ वर्षे १७१ दिवस- सौरव गांगुली
३५ वर्षे ९९ दिवस- सुनील गावसकर
महत्त्वाच्या बातम्या-
कोरोना संक्रमित राउफच्या जागी ‘या’ हॅट्रिकवीराची पाकिस्तानच्या कसोटी संघात वर्णी, करणार पुनरागमन