एकदिवसीय क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत बऱ्याच अशा घटना अथवा सामने झालेले आहे जे प्रेक्षक कधीही विसरू शकणार नाहीत. १९९९ विश्वचषकातील उपांत्य फेरीचा सामना, द. आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेला ४३४ धावांचा यशस्वी पाठलाग, नेटवेस्ट ट्रॉफी २००२ चा अंतिम सामना नाहीतर २०१९ क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना या एकदिवसीय क्रिकेटमधील काही ठळक घटना आहेत. मात्र, २० ऑगस्ट २००६ या दिवशी देखील एकदिवसीय क्रिकेटमधील एक अशी घटना नेपाळ व म्यानमार दरम्यानच्या सामन्यात घडली होती, जी आजही एक विश्वविक्रम म्हणून कायम आहे.
मलेशियामध्ये २००६ ची आशियाई क्रिकेट कौन्सिल (एसीसी) करंडक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. म्यानमार, नेपाळ, हाँगकाँग, कुवैत आणि भूतान यांना क गटात स्थान देण्यात आले होते. म्यानमारसाठी स्पर्धेची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. पहिल्या सामन्यात कुवेतने ९ गड्यांनी तर हाँगकाँगने ४४२ धावांनी त्यांना पराभूत केले. त्यानंतर, भूतान व नेपाळच्या हातूनही त्यांना पराभव पत्करावा लागला.
दुसरीकडे, संभाव्य विजेते नेपाळने भूतान व कुवेतला सहजतेने हरवले. हाँगकाँग विरुद्ध त्यांना थोडा संघर्ष करावा लागला, मात्र अखेरीस त्यांनी सामना आपल्या नावे केला.
२० ऑगस्ट २०२० रोजी म्यानमार व नेपाळ दरम्यान सामना होता. नेपाळच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. म्यानमारची स्पर्धेतील स्थिती पाहून नेपाळ विजय होणार हे निश्चित होते, मात्र, म्यानमार कमीतकमी थोडा संघर्ष करेल अशी अपेक्षा होती.
नेपाळचा डावखुरा वेगवान गोलंदाज मेहबूब आलम याने गोलंदाजीची सुरुवात केली. पहिल्या चेंडूवर त्याने ओमरला बाद केले. पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर म्यानमारच्या मेहमूदच्या यष्ट्या त्याने उद्ध्वस्त केल्या. सामन्यातील तिसरे षटक टाकताना त्याने पुन्हा दोन फलंदाज माघारी पाठवले. तिसरे षटक संपण्याआधी, म्यानमारची अवस्था चार बाद चार धावा अशी झाली होती. परत, पाचवे षटक टाकताना त्याने, म्यानमारचा कर्णधार टीन आय व ये मायो यांना बाद केले. आलम एकटाच १० बळी घेतोय काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
मात्र, आलमला दुसऱ्या बाजूने साथ देणाऱ्या बिनोद दास याने आलमच्या मनसुब्यावर पाणी फिरले. २० चेंडूत १ धाव काढून खेळत असलेला सलामीवीर झकारिया याला दासने बाद केले. त्यानंतर दासने पुन्हा दोन फलंदाज एकापाठोपाठ एक बाद केले. पण, याच दरम्यान म्यानमारने दुहेरी धावसंख्या गाठली. १२.१ षटके फलंदाजी करताना म्यानमारने १० धावा काढल्या. आलमने ३ धावा देत ७ बळी आपल्या नावे केले तर दासने ४ धावा देऊन ३ गडी गारद केले.
नेपाळकडून सलामीवीर महेश छेत्री आणि धीरेंद्र चंदने डावाची सुरुवात केली. म्यानमारच्या आय मिन थानच्या पहिल्या चेंडूवर छेत्रीने तीन धावा काढल्या. दुसऱ्या चेंडूवर चंदने देखील तीन धावा घेतल्या. त्यानंतर आय मिन थानने तीन वाइड फेकले. त्यातील, एक चेंडू यष्टीरक्षक पकडू शकला नाही आणि फलंदाजांनी आणखी दोन धावा कोणी काढल्या. परिणामी, नेपाळने केवळ ०.२ षटकांत २९८ चेंडू राखून विजय मिळवला.
आलमने आपला स्वप्नवत फॉर्म पुढील स्पर्धेतही कायम ठेवला. दोन वर्षांनंतर, आयसीसीच्या मान्यताप्राप्त, आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन ५ सामन्यात मोझांबिक विरुद्ध १२ धावांत त्याने १० बळी मिळवले. याआधी, जिम लेकर आणि अनिल कुंबळे हेच एका डावात विरुद्ध संघाचे सर्वच्या सर्व १० बळी घेण्यात यशस्वी ठरले होते. या दोघांपाठोपाठ, मेहबूब आलम याचे नाव देखील गिनीज बुकमध्ये नोंदवले गेले.