मुंबई । भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) घटनेतील दुरुस्ती ऐकण्यास सहमती दर्शविली असून या प्रकरणाची सुनावणी दोन आठवड्यांनंतर होईल. या खटल्याची सुनावणी करताना सरन्यायाधीश सीए बोबडे आणि एल नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने बीसीसीआयच्या घटनेत दुरुस्ती करण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्याचे मान्य केले आहे.
बीसीसीआयच्या वतीने सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया तुषार मेहता उपस्थित होते तर कपिल सिब्बल यांनी तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन आणि हरीश साळवे यांनी हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या वतीने अर्ज सादर केला. बीसीसीआयने गेल्या 21 एप्रिल रोजी झालेल्या पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घटनेत सुधारणा करण्याचा प्रस्ताव दिला होता. या दुरुस्तीत बीसीसीआय अध्यक्ष व सचिव पदाच्या कार्यकाळात बदल करण्याचा प्रस्ताव होता.
लोढा समितीच्या म्हणण्यानुसार, राज्य व बीसीसीआयच्या बोर्डावर सलग ६वर्ष राहिल्यानंतर ३ वर्षांची विश्रांती ज्याला कुलिंग पिरेड म्हटले जाते ते गरजेचे आहे. सौरव गांगुली व जय शहा यांचा हा काळ पुर्ण झाला आहे. कारण ते आपल्या राज्याच्या संघटनेवरही यापुर्वी काम करत होते.
बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून गांगुली यांचा कार्यकाळ या महिन्याच्या शेवटी संपत आहे आणि नियमांनुसार ते यापुढे या पदावर राहू शकत नाहीत. गांगुलीप्रमाणेच शहा यांची सचिवपदाची मुदत संपुष्टात आली आहे पण ते अजूनही पदावर आहेत.