क्रिकेटच्या कुंभमेळ्याआधी आपण भारतातील एक एक स्टेडियमची माहिती घेतोय, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं स्टेडियम म्हणजे कोलकात्याचं ईडन गार्डन. भारतीय क्रिकेटचा उगम मुंबईत झाला असला तरी, भारतीय क्रिकेटची पंढरी मात्र कोलकाता आणि हे ईडन गार्डन्स. अगदी समृद्ध इतिहास असलेल्या या स्टेडियमची खडानखडा माहिती आपण येथे घेऊ.
कोलकात्याच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या स्टेडियमला ईडन गार्डन्स नाव कसे पडले याच्या अनेक कहाण्या सांगितल्या जातात.. आपण त्या कहाण्या थोडक्यात जाणून घेऊयात. त्यावेळी कोलकात्यातील मोठे जमीनदार असलेल्या बाबू राजचंद्र दास यांनी मार बागान नावाची ही जागा व्हाईसरॉय आकलँड ईडन आणि त्यांची बहीण एमिली ईडन यांना भेट म्हणून दिली होती. त्यानंतर त्यांनी या जागेचे नामकरण ऑकलँड गार्डन असे केले. जे कालांतराने त्यांनी ईडन गार्डन्स झाले. दुसरी गोष्ट अशी सांगितली जाते की, बंगालमधील सर्वात जुन्या गार्डनपैकी एक असलेल्या ईडन गार्डन्सला लागून असल्याने त्या जागेला ईडन गार्डन्स म्हटले गेले. तर काहीजण बायबलमधील गार्डन ऑफ ईडन्सचा संदर्भ या जागेसाठी देतात. हा इतिहास काही असला तरी, ब्रिटिशांनी क्रिकेट खेळण्यासाठीच या जागेचा वापर केला हे ढळढळीत सत्य आहे.
सन 1841 मध्ये या जागेवर क्रिकेट स्टेडियम बनवण्याचे डिझाईन तयार झाल्याचे सांगण्यात येते. तर 1864 मध्ये या स्टेडियमचे काम पूर्ण झाले. याच कारणाने या मैदानाला भारतीय क्रिकेटची पंढरी असेल म्हटले जाऊ लागले. 1934 मध्ये ज्यावेळी इंग्लंडने भारताचा दौरा केला त्यावेळी दुसरा सामना याच ईडन गार्डन्सवर खेळला गेला. त्यानंतर या मैदानावर सातत्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने तसेच फुटबॉल सामने देखील खेळले जाऊ लागले. भारतीय क्रीडा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण ठिकाणांपैकी एक अशी ईडनची ओळख बनली.
ईडन गार्डन्सवर नेहरू कपसारखी प्रतिष्ठेची फुटबॉल स्पर्धा खेळली गेली. 1984 नेहरू कपमध्ये त्यावेळीचा सर्वोत्तम संघ असलेल्या ऊरूग्वेशी भारताने दोन हात केले होते. याच मैदानावर 1980 मध्ये मात्र एक भयावह घटना घडली. 16 ऑगस्ट रोजी कोलकाता फुटबॉल लीगच्या ईस्ट बंगाल विरुद्ध मोहन बागान या सामन्यात चेंगराचेंगरी झाली. यामध्ये तब्बल 16 लोकांना आपला जीव गमवावा लागला. भारतातील फुटबॉल स्टेडियमवर झालेली ही एकमेव घटना म्हणून आजही या दुर्दैवी दिवसाचा उल्लेख होतो.
ईडन गार्डन्स स्टेडियमला जास्तीचे महत्व प्राप्त झाले ते म्हणजे प्रथमच इंग्लंड बाहेर होत असलेल्या क्रिकेट वर्ल्डकपमुळे. 1987 मध्ये भारत आणि पाकिस्तानने वर्ल्डकप आयोजनाचे शिवधनुष्य पेलले आणि फायनलचा मान मिळाला ईडन गार्डन्सला. जगमोहन दालमिया ज्यावेळी बीसीसीआय प्रशासनात होते त्यावेळी कोलकाता आणि ईडन गार्डन्स हे भारतीय क्रिकेटचे मुख्य केंद्र बनलेले. मैदानाची क्षमता देखील तब्बल एक लाखापर्यंत वाढवण्यात आलेली. जगातील अनेक क्रिकेटपटू खुल्या दिलाने मान्य करत की, ईडन गार्डन्स ही क्रिकेट खेळण्यासाठी सर्वोत्तम जागा आहे.
ईडन गार्डन्स जसे त्याच्या ऐतिहासिक वारशासाठी ओळखले जाते, तसेच प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीची एक काळी बाजू देखील याच मैदानाला आहे. 1996 वर्ल्डकप सेमी फायनलमध्ये भारतीय संघ श्रीलंकेकडून पराभूत होतोय असे वाटत असताना, जमलेल्या जवळपास एक लाख प्रेक्षकांनी श्रीलंकन खेळाडूंवर फेकलेल्या वस्तू, आणि त्यानंतर स्टेडियममध्ये केलेली जाळपोळ हा समस्त भारतीय क्रिकेटला लागलेला डाग मानला जातो. त्यादिवशी रडत मैदान सोडणाऱ्या विनोद कांबळीचा चेहरा कोणताच भारतीय क्रिकेट चाहता विसरणार नाही. तर पाकिस्तानविरुद्ध प्रेक्षकांना शांत करण्याची जबाबदारी थेट सचिन तेंडुलकरला घ्यावी लागली. हे देखील याच मैदानावर दिसले.
ईडन गार्डनचे महत्व भारतीय क्रिकेटमध्ये अनन्यसाधारण असले तरी, 2011 वनडे वर्ल्डकपवेळी ईडनला भारताच्या एकाही मॅचचे यजमानपद भूषवता आले नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना या मैदानावर खेळला जाणार होता. मात्र, नूतनीकरणात त्रुटी राहिल्याने या सामन्याचे यजमानपद बेंगलोरला दिले गेले. याच वर्ल्डकपवेळी ईडनवर खेळल्या गेलेल्या केनिया विरुद्ध झिम्बाब्वे या सामन्यात फक्त 15 तिकिटांची विक्री झालेली. लाख-लाख प्रेक्षक एका वेळेला पाहण्याची सवय असलेल्या ईडनसाठी हे दुर्दैवी चित्र होते.
दरम्यानच्या काळात सातत्याने ईडन गार्डन्सवर आंतरराष्ट्रीय सामने होत राहीले. मात्र, 2016 ला दोन महामुकाबल्यांचा साक्षीदार होण्याची संधी ईडनला मिळाली. 2016 टी20 वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान सामना खेळला गेला, ज्यामध्ये विराटने आपला आदर्श असलेल्या महान सचिन तेंडुलकरला आपली खेळी अर्पण केली. तर फायनलमध्ये वेस्ट इंडीजने इंग्लंडला अत्यंत थरारक सामन्यात मात दिली. कार्लोस ब्रेथवेटचे चार षटकार पाहण्याचे आणि इयान बिशपचे “रिमेंबर द नेम” हे शब्द ऐकण्याचे भाग्य ईडनला लाभले.
जागतिक दर्जाच्या सर्वसुविधा असलेले जगातील तिसरे आणि भारतातील दुसरे सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या या ईडनवर आता वर्ल्डकपच्या कुंभमेळ्यात पाच सामने होतील. यातील पाकिस्तान-बांगलादेश, भारत-दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान-इंग्लंड या सामन्यांवर सर्वांचीच नजर असेल. आणि सगळ्या गोष्टी जुळून आल्याच तर, भारत-पाकिस्तान सेमी-फायनलचे युद्ध देखील याच ऐतिहासिक ईडन गार्डनवर रंगेल. आणि कदाचित इथूनच भारताची फायनलची वाट मोकळी होईल.
(2023 ODI World Cup Stadiums Eden Gardens Story And History)
हेही वाचा-
दक्षिण आफ्रिकेला तगडा झटका! वर्ल्डकप 2023पूर्वी मायदेशी परतला कॅप्टन, कोण हाकणार संघाचा गाडा?
Breaking: बांगलादेश क्रिकेटमध्ये भूकंप! वर्ल्डकप आधीच कर्णधार शाकिबची निवृत्तीची घोषणा