प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते की, त्याला आपल्या देशाकडून क्रिकेट खेळण्याची संधी मिळावी. एकदा राष्ट्रीय संघात प्रवेश मिळाला की, क्रिकेटपटू आपल्या जबरदस्त प्रदर्शनाने संघातील आपले स्थान पक्के करण्याच्या प्रयत्नात असतात. पण, जेव्हा क्रिकेटपटू संघातील दिग्गज खेळाडू म्हणून ओळखला जातो, तेव्हा त्याचे स्वप्न असते की त्याला आपल्या संघाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळावी.
आतापर्यंत ३० पेक्षाही जास्त क्रिकेटपटूंनी भारतीय कसोटी संघाचे नेतृत्त्व केले आहे. त्यापैकी एमएस धोनी हा असा कर्णधार आहे, ज्याने सर्वाधिक कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्त्व केले आहे. धोनीने ६० कसोटी सामन्यात संघाचे नेृतृत्त्व केले आहे. तर, विराट कोहलीने आतापर्यंत ५५ कसोटी सामन्यांत संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे.
पण, भारतीय संघात असेही काही खेळाडू होऊन गेले आहेत, ज्यांनी कित्येक वर्षे भारताकडून कसोटी क्रिकेट खेळले आहे. पण, त्यांना एकाही सामन्यात संघाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली नाही. या लेखात अशाच ३ दिग्गज भारतीय खेळाडूंचा आढावा घेण्यात आला आहे.
३. इशांत शर्मा – ९७ सामने
इशांत शर्मा हा भारतीय संघातील दिग्गज वेगवान गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत भारताकडून ९७ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ३२.३९ च्या सरासरीने २९७ विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान त्याने ११ वेळा एका कसोटी डावात ५ विकेट्स घेण्याचा आणि एक वेळा एका कसोटी सामन्यात १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. आतापर्यंतचे त्याचे कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी प्रदर्शन हे ७४ धावा देत ७ विकेट्स हे आहे. हा कारनामा त्याने इंग्लंडविरुद्ध २०१४ साली केला होता.
गेल्या १४ वर्षांत इशांतने ६ कर्णधारांच्या नेतृत्त्वाखाली कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये एमएस धोनी, विराट कोहली, अनिल कुंबळे, विरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड आणि अजिंक्य रहाणे यांचा समावेश आहे. परंतु, इशांतला स्वत:ला कधीही आपल्या संघाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळालेली नाही.
२. हरभजन सिंग – १०३ सामने
भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने भारताकडून एकूण १०३ कसोटी सामने खेळले आहेत. त्याच्या जबरदस्त गोलंदाजी प्रदर्शनाने त्याने भारतीय संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. त्याने १९९८पासून ते २०१५पर्यंत भारतीय कसोटी संघाचे प्रातिनिधित्त्व केले. दरम्यान तो ८ कर्णधारांच्या नेतृत्त्वाखाली खेळला. पण, हरभजनला त्याच्या कसोटी कारकिर्दीत एकाही सामन्यात संघाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली नाही.
हरभजनने १०३ कसोटी सामन्यांत ३२.४६च्या सरासरीने ४१७ विकेट्स घेतल्या होत्या. दरम्यान त्याने २५ वेळा एका कसोटी डावात ५ विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. तर, २००१मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी प्रदर्शन केले होते. यावेळी त्याने ८४ धावा देत ८ विकेट्स घेतल्या होत्या.
१. व्हीव्हीएस लक्ष्मण – १३४ सामने
व्हीव्हीएस लक्ष्मणच्या नावावर कर्णधार न बनता सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याच्या विक्रमाची नोंद आहे. तसेच, तो भारताकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा तिसरा खेळाडू आहे. लक्ष्मणने त्याच्या कसोटी कारकिर्दीत एकूण १३४ सामने खेळले होते. दरम्यान त्याने १७ शतकांच्या मदतीने ८७८१ धावा केल्या होत्या. २००१मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध लक्ष्मणने केलेल्या २८१ धावांच्या खेळीला कोणीही विसरु शकत नाही.
आपल्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत लक्ष्मण ७ कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळला आहे. पण, त्याला एकदाही भारतीय संघाचे नेतृत्त्व करायला मिळाले नाही.
ट्रेंडिंग लेख –
सध्याच्या टीम इंडियाचे ३ मुख्य शिलेदार, ज्यांनी एकाही सामन्यात केली नाही कॅप्टन्सी
लॉर्ड्सवरील ऑनर्स बोर्डवर नाव नसलेले ५ महान फलंदाज
आयपीएल २०२०: युएईमध्ये शतक झळकावू शकतात हे मुंबई इंडियन्सचे ३ धडाकेबाज फलंदाज…
महत्त्वाच्या बातम्या –
बीसीसआयने नाही म्हटले नाही, पण विवोनेच घेतली प्रायोजक होण्यापासून माघार
कोरोना पॉझिटीव्ह झालेल्या अमित शहांकडे आयपीएल न होण्यासाठी साकडे, पहा कुणी केलीय मागणी
कोणताच क्रिकेटचाहता विसरू शकणार नाही असा झिम्बाब्वेचा नील जॉन्सन