भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य राहणे मागील काही वर्षापासून संघासाठी मध्य क्रमातील महत्त्वाचा भाग आहे. नजीकच्या काळात त्याने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध कसोटी मालिकेत विराट कोहलीच्या गैरहजेरीत संघाचे कर्णधारपद सांभाळत भारताला शानदार विजय मिळवून दिला होता. पण या पूर्ण कसोटी मालिकेत त्याचे एक शतक सोडले तर त्याचे प्रदर्शन काही खास नव्हते. तसेच इंग्लंड विरुद्ध घरेलू कसोटी मालिकेत रहाणे चार सामन्यात केवळ एक अर्धशतकासह 112 धावा करू शकला होता. विश्व कसोटी चँपियनशीपच्या अंतिम सामन्यात त्याने पहिल्या डावात 49 धावा केल्या होत्या. पण दुसर्या डावात मात्र तो लवकरच बाद झाला होता.
रहाणे जरी कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात यशस्वी खेळाडू असला तरी मोक्याच्या वेळी त्याने संघाला निराश केले असल्याचे आपल्याला दिसते. संघाने त्याच्यावर बऱ्याच काळापासून विश्वास दाखवला आहे. पण आता वेळ आली आहे की संघाने रहाणेच्या जागी अन्य फलंदाजांना संधी द्यायला हवी. भारताकडे अनेक प्रतिभाशाली खेळाडू आहेत, जे संघाच्या प्लेइंग 11 चा भाग बनण्यासाठी इच्छुक आहेत.
भारतीय संघाला पुढील महिन्यात 4 तारखेपासून इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. अशात संघ व्यवस्थापन रहाणेच्या जागी इतर क्रिकेटपटूंना आजमावून पाहू शकते. या लेखात आपण अशाच २ पर्यांयाची माहिती देण्यात आली आहे, जे मधल्या फळीत रहाणेची जागा घेऊ शकतील.
1. हनुमा विहारी
ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका जिंकणाऱ्या भारतीय संघातील बऱ्याचशा खेळाडूंना कसोटी चँपियनशीपच्या अंतिम सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्या खेळाडूंमधले एक नाव म्हणजे हनुमा विहारी. त्याने सिडनी कसोटीमध्ये दुखापतग्रस्त असूनही चांगली फलंदाजी केली होती आणि सामना अनिर्णीत राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
त्याने आजवर त्याच्या कसोटी कारकिर्दीत 12 कसोटी सामन्यात 30.84 च्या सरासरीने 624 धावा केल्या आहेत. विहारीचे आकडे साधारण असले तरीही त्याला खेळण्याची जास्त संधी मिळाली नाही. पण त्याने छोट्या कार्यकाळात त्याचे कौशल्य नक्कीच दाखवले आहे. 2018 मध्ये त्याने कसोटी पदार्पणाच्या सामन्यात उत्कृष्ट अर्धशतक केले होते. त्या व्यतिरिक्त वेस्ट इंडिज दौऱ्यावर त्याने चांगली कामगिरी करत संघासाठी सर्वाधिक धावा बनवल्या होत्या. अशात रहाणे इंग्लंडविरुद्ध सुरुवातीच्या काही सामन्यात अपयशी ठरला तर विहारीला मध्यक्रमात संधी मिळायला हवी.
2. केएल राहुल
अजिंक्य रहाणेचा खराब फॉर्म केएल राहुलसाठी भारतीय कसोटी संघाचा रस्ता खुला करू शकतो. जर सलामीसाठी संघ रोहित शर्माबरोबर मयंक अगरवालवर विश्वास दाखवत असेल तर मध्य क्रमासाठी राहुल कसोटी संघात रहाणेची जागा घेऊ शकतो. राहुलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये दाखवून दिले आहे की तो मध्य क्रमातही उत्तम फलंदाजी करू शकतो.
राहुलसाठी संघात स्थान मिळवणे कठीण आहे. कारण याने बऱ्याच काळापासून कसोटी सामने खेळलेले नाहीत. परंतु काही दिवसांपुर्वी भारत विरुद्ध काउंटी सिलेक्ट इलेव्हन संघात झालेल्या ३ दिवसीय सराव सामन्यात त्याने धडाकेबाज खेळी करत शतक झळकावले होते. अशात संघ व्यवस्थापन त्याला संधी देऊन पाहू शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
द्रविड घेणार का भारताचे मुख्य प्रशिक्षक शास्त्री यांची जागा? स्वत: ‘द वॉल’ने दिले उत्तर
निर्णायक सामन्यात संजू सॅमसन भोपळाही न फोडता बाद, नेटकऱ्यांनी केले भरपूर ट्रोल