मंगळवारी (९ नोव्हेंबर) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने १७ नोव्हेंबरपासून न्यूझीलंड विरुद्ध सुरू होणाऱ्या टी२० मालिकेसाठी भारताच्या टी२० संघाची घोषणा केली. याबरोबरच रोहित शर्माला भारताचा नवा टी२० कर्णधार म्हणूनही नियुक्त करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच विराट कोहलीने भारताच्या टी२० संघाचे नेतृत्व सोडण्याची घोषणा केली होती.
विराटने सांगितले होते की, टी२० विश्वचषक २०२१ ही त्याची भारतासाठी टी२० कर्णधार म्हणून अखेरची स्पर्धा असेल. त्यानंतर तो केवळ एक फलंदाज म्हणून टी२० संघात खेळेल. त्यामुळे, आता टी२० विश्वचषकानंतर भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपद कोणाला दिले जाणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. आता या चर्चांना पूर्णविराम देत रोहितच्या नावावर टी२० कर्णधार म्हणून शिक्कामोर्तब झाले आहे.
‘हिटमॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्माची टी२० आकडेवारी पाहायला गेलो, तर ती उत्तम आहे. आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये त्याच्या नावावर जलद शतक ते सर्वाधिक शतकं, अशी अनेक विक्रम आहेत. या लेखात आपण रोहित भारताचा टी२० क्रिकेटमध्ये चांगला कर्णधार का बनू शकतो याबद्दल आढावा घेऊ.
१. टी२० क्रिकेटमध्ये नेतृत्वाचा तगडा अनुभव –
रोहित गेल्या अनेक वर्षांपासून भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघाचे उपकर्णधारपद सांभाळत होता. त्यामुळे भारताच्या नेतृत्व गटातील तो महत्त्वाचा सदस्य राहिला आहे. त्याचबरोबर त्याने अनेकदा त्याने विराटच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्वही केले आहे. विराटच्या अनुपस्थितीत त्याच्या नेतृत्त्वाखाली भारताने आशिया चषक, निदाहास ट्रॉफी, अशा महत्त्वाच्या मालिकांमध्ये विजय मिळवला आहे.
रोहितने भारतीय संघाचे आतापर्यंत २९ सामन्यांत नेतृत्व केले आहे. त्यापैकी २३ सामन्यांमध्ये संघाने विजय मिळवला, तर केवळ ६ सामन्यांत भारताला पराभव पत्करावा लागला. यातील १९ सामने टी२० क्रिकेटचे होते. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने १५ टी२० सामन्यांत विजय मिळवला आहे, तर ४ सामन्यांत पराभव स्विकारला आहे. टी२० मध्ये भारताचा तो तिसरा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. एमएस धोनीने ४१ आणि विराट कोहलीने ३० टी२० सामने भारताला जिंकून दिले आहेत.
एवढेच नाही तर, २०१३ सालापासून रोहित इंडियन प्रीमीयर लीगमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत आहे. मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना स्वत:ला कर्णधार म्हणून सिद्ध केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० या ५ मोसामांचे आयपीएल विजेतेपद मिळवले आहे. तो आयपीएलमधील एक यशस्वी कर्णधार आहे. त्यामुळे त्याची ही आकडेवारी पाहाता, त्याच्याकडे टी२० कर्णधारपदाचा चांगला अनुभव आहे.
२. कर्णधार असताना रोहितची वैयक्तिक चांगली कामगिरी –
रोहित कर्णधार असताना केवळ संघानेच चांगली कामगिरी केली आहे, असे नाही, तर त्यानेही त्याची वैयक्तिक कामगिरी चांगली केली आहे. रोहितने आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये भारतीय संघाचे १९ सामन्यात कर्णधारपद सांभाळताना २ शतकेही केले आहेत. तसेच ५ अर्धशतके केली आहे. त्याने कर्णधार म्हणून ४१.८८ च्या सरासरीने ७१२ धावा केल्या आहेत. तो आंतरराष्ट्रीय टी२० कर्णधार म्हणून सर्वाधिक शतकं करणारा खेळाडू आहे. त्याच्याव्यतिरिक्त कोणत्याही कर्णधाराला २ शतकं टी२०मध्ये करता आलेली नाही.
वनडेत त्याने १० सामन्यात नेतृत्व करताना तब्बल ७७.५७ च्या सरासरीेने ५४३ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २०८ धावांच्या द्विशतकी खेळीचाही समावेश आहे. एवढेच नाही तर, रोहितची आयपीएलमध्ये कर्णधार झाल्यानंतरचीही कामगिरी चांगली राहिली आहे. त्यामुळे आपण असे म्हणू शकतो की कर्णधारपदामुळे रोहितमधील सर्वोत्तम कामगिरी बाहेर येते.
३. खेळाडूंवर विश्वास आणि खेळाची जाण –
आजपर्यंत रोहितच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या खेळाडूंनी त्याचे कौतुक करताना म्हटले आहे की रोहित खेळताना स्वातंत्र्य देतो. तसेच तो विश्वास दाखवतो. त्याचबरोबर रोहित आयपीएलमध्येही मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना खेळाडूंवर पूर्ण विश्वास ठेवतो. त्यामुळे तो संघात फार कमी बदल करताना दिसतो. तसेच रोहितला खेळाचीही चांगली जाण असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. त्याने क्षेत्ररक्षण लावताना आणि गोलंदाजीत बदल करताना घेतलेले काही निर्णय भारतीय संघासाठी महत्त्वाचे देखील ठरले आहेत. त्यामुळे तो कर्णधार म्हणून यशस्वी ठरु शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारत अ संघाची घोषणा; ‘या’ खेळाडूकडे कर्णधारपद, तर शॉ, पड्डीकललाही संधी
अजिंक्य रहाणेची बॅट तळपली! मुंबईचे नेतृत्व करताना अवघ्या ५ सामन्यांत ठोकली ४ अर्धशतकं