राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, हलदवानी : पालघरच्या धीर्ती अहिरवाल हिने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील जलतरणच्या २०० मिटर बटरफ्लाय प्रकारात महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून देण्याचा पराक्रम केला. धिर्तिने २ मिनिटे २३.८० सेकंद वेळेसह सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली. कर्नाटकची सुहासिनी घोष व आसामची अस्था चौधरी यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळाले.
जलतरणातील महिलांच्या ४ बाय २०० मिटर फ्री स्टाईल प्रकारात महाराष्ट्राला रौप्य पदक मिळाले, तर पुरुषांच्या ४ बाय २०० मिटर फ्री स्टाईल प्रकारात महाराष्ट्राला कांस्यपदक मिळाले. महिला गटात अन्वी देशवाल, सान्वी देशवाल, धिर्ति अहिरवाल व अदिती हेगडे या चौकडीने ९ मिनिटे ९.३७ सेकंद वेळेसह रूपेरी यशाला मिठी मारली. कर्नाटक संघाने सुवर्णपदक पटकाविले, तमिळनाडूला कांस्यपदक मिळाले. पुरुष गटात शुभम धायगुडे, ओम साटम, ऋषी भगत व ऋषभ दास या चौ घांनी ७ मिनिटे ५५.६२ सेकंद वेळेसह कांस्यपदकाची कमाई केली. कर्नाटक व गुजरात संघाने अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक पटकाविले.