उत्तराखंड 2024-25 डेहराडून: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रग्बी सेव्हनमध्येही महाराष्ट्राने खाते उघडून 1 रौप्य व 1 कांस्य पदकांची कमाई केली. अंतिम लढतीत दिल्लीकडून पराभूत झाल्याने पुरूष संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले तर महिला संघाने दिल्लीला नमवून कांस्यपदक खेचून आणले.
महाराणा प्रताप क्रीडा संकुलात संपलेल्या रग्बी सेव्हन स्पर्धेत महाराष्ट्राने प्रथमच दुहेरी पदकाची करिश्मा घडविला. पुरूषांच्या अंतिम सामन्यात बलाढ्य हरियाणाने महाराष्टाला 22-7 गुणांनी पराभूत केले. ओरिसा व दिल्ली संघाना नमवून अंतिम फेरीत धडक मारणार्या महाराष्ट्र संघाला अंतिम फेरीत सूर गवसला नाही. प्रशांत सिंग व तेजस पाटीलने आक्रमण करून 7 गुणांची कमाई केली. सांघिक खेळाच्या जोरावर हरियाणाने सुवर्णपदक जिंकले. गत गोवा स्पर्धेत महाराष्ट्राला कांस्य पदक मिळाले होते.
महिलांच्या कांस्य पदकाच्या लढतीत महाराष्ट्राने दिल्लीवर 17-10 गुणांनी दणदणीत विजय संपादन केला. उपांत्य लढतीत ओरिसाकडून 5-31 गुणांनी पराभूत झाल्यानंतर मनाधैर्य खेचून न जाता महाराष्ट्राच्या मुलींनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन घडवले. अनुभवी कल्याणी पाटील, आकांक्षा काटकारे व सारा खान यांनी सुरूवातीपासून आघाडी देत कांस्यपदकावर राज्याचे नाव कोरले. या संघाने गत स्पर्धेत चौथे स्थान प्राप्त झाले होते.