शनिवारी भारतीय क्रिकेट नियमक मंडळाने(बीसीसीआय) मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा आणि पुनम यादव या चार क्रिकेटपटूंची 2019 च्या अर्जून पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयसाठी नेमुन दिलेल्या समीतीने सबा करिम यांच्या उपस्थितीत या चार क्रिकेटपटूंची नावे निश्चित केली.
मागील अनेक महिन्यांपासून जडेजा, शमी आणि बुमराह हे भारतीय कसोटी संघाचे नियमित सदस्य आहेत. तसेच बुमराह हा वनडे क्रमवारील अव्वल क्रमांकाचा गोलंदाज आहे. त्याने 2016 मध्ये भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले असून आत्तापर्यंत 101 सामन्यात 21.54 च्या सरासरीने 185 विकेट्स घेतल्या आहेत.
त्याचबरोबर ऑस्ट्रेलियामध्ये या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय संघाने पहिल्यांदा मिळवलेल्या कसोटी मालिका विजयात शमी आणि बुमराहने मोलाचा वाटा उचलला होता. शमीचीही मागील काही महिन्यांपासून उत्कृष्ट कामगिरी झाली आहे. त्याने भारताकडून 110 सामन्यात 28.13 च्या सरासरीने 265 विकेट्स घेतल्या आहेत.
शमी आणि जडेजाने कसोटीमध्ये चांगली कामगिरी करतानाच वनडेमध्येही पुनरागमन केले आहे. जडेजा हा भारतीय संघातील अनुभवी क्रिकेटपटू असून तो आयसीसी कसोटी क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकाचा अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. तर गोलंदाजी क्रमवारीत तो 6 व्या क्रमांकावर आहे.
शमी, बुमराह आणि जडेजा या तिघांचाही 30 मेपासून इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषकासाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
त्यांच्याबरोबरच अर्जून पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेली महिला क्रिकेटपटू पुनम यादवनेही भारतीय संघाकडून चांगले गोलंदाजी प्रदर्शन केले आहे. 27 वर्षीय पुनमने 2013 मध्ये भारताकडून पदार्पण करताना आत्तापर्यंत 1 कसोटी, 41 वनडे आणि 54 टी20 सामने खेळले आहेत. यात तीने अनुक्रमे 3, 63 आणि 74 विकेट्स घेतल्या आहेत.
1961 पासून सुरुवात झालेला प्रतिष्ठित अर्जून पुरस्कार हा केंद्रीय युवा कल्याण व क्रीडा मंत्रालयाकडून खेळात चांगली कामगिरी करणाऱ्या क्रिडापटूंना दिला जातो. हा पुरस्कार विजेत्यांना ट्रॉफी आणि 5 लाख रुपयांचे बक्षिस दिले जाते.
महत्त्वाच्या बातम्या –
–पुरुषांच्या वनडे सामन्यात अंपायरिंग करणारी ती बनली पहिला महिला…
–रोहित शर्माचा मोठा खूलासा, या कारणामुळे चेन्नई सुपर किंग्सचा झाला पराभव
–चेन्नई सुपर किंग्सच्या बाबतीत पाचव्यांदाच घडली अशी गोष्ट