जेव्हा एखादा खेळाडू क्रिकेटमधील कोणताही प्रकार खेळतो, तेव्हा त्याला एकदातरी क्रमवारीत पहिला क्रमांक मिळवण्याची इच्छा असते. क्रिकेट क्रमवारीमध्ये अव्वल स्थान मिळविण्यासाठी खेळाडू भरपूर मेहनत करतो. खरं तर कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांकाचे स्थान मिळवणे फार कठीण असते. कसोटी क्रिकेटमध्ये धावा काढण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागेल आणि संयमाने खेळावे लागते. यामध्ये असे बरेच खेळाडू आहेत ज्यांनी हे स्थान गाठले आहे.
मात्र असेही काही क्रिकेटपटू होऊन गेले, ज्यांनी त्यांच्या कसोटी कारकिर्दीत खूप यश मिळवले, आज ते दिग्गज क्रिकेटपटू म्हणूनही ओळखले जातात, पण त्यांना आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत मात्र अव्वल स्थान मिळवता आले नाही.
या लेखातही अशाच ४ दिग्गज फलंदाजांचा आढावा घेण्यात आला आहे, ज्यांनी एकदाही कसोटी क्रमवारीत प्रथम क्रमांक मिळवला नाही. विशेष म्हणजे त्यांनी अनेक सामन्यात त्यांच्या संघाचे नेतृत्वही केले आहे.
४ दिग्गज फलंदाज ज्यांना आपल्या कसोटी क्रिकेट कारकीर्दीत कधीही क्रमवारीत अव्वल स्थान गाठता आले नाही-
४. फाफ डू प्लेसीस (Faf du Plessis)
फाफ डू प्लेसीसने २०१२ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत आपल्या कारकीर्दीत एकूण ६५ कसोटी सामने खेळले असून ३९०१ धावा केल्या आहेत. त्याने ९ शतके आणि २१ अर्धशतके झळकावली. हा एक दिग्गज फलंदाज असूनही डू प्लेसीस आपल्या आतापर्यंतच्या कारकीर्दीत क्रमवारीत कधीही अव्वल क्रमांकावर पोहोचला नाही.
डू प्लेसिसने ३६ कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्वही केले आहे. यात त्याने १८ सामन्यात विजय आणि १५ पराभव पाहिले आहेत. याशिवाय ३ सामने अनिर्णित राहिले आहेत.
३. ब्रेंडन मॅक्यूलम (Brendan McCallum)
न्यूझीलंडचा जबरदस्त फलंदाज आणि माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्यूलम वनडे क्रिकेटप्रमाणेच कसोटी क्रिकेटमध्येही खेळला. त्याच्या नावावर कसोटीमध्ये तिहेरी शतकही आहे पण कसोटी क्रमवारीत तो नंबर १ स्थानावर कधी पोहोचू शकला नाही. त्याने आपल्या कारकीर्दीत एकूण १०१ कसोटी सामने खेळले आणि ६४५३ धावा केल्या. यामध्ये त्याने १२ शतके आणि ३१ अर्धशतके झळकावली. या व्यतिरिक्त त्याने आपल्या कारकीर्दीत ४ दुहेरी शतकेही केली आहेत.
तसेच त्याने ३१ कसोटी सामन्यात नेतृत्व केले असून त्याने कर्णधार म्हणून ११ विजय आणि ११ पराभव स्विकारले आहेत. त्याचबरोबर ९ सामने अनिर्णित राहिले आहेत.
२. केव्हिन पीटरसन (Kevin Peterson)
केविन पीटरसनने २००५ च्या अॅशेस मालिकेमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने आपल्या कारकीर्दीत एकूण १०४ कसोटी सामने खेळले असून त्यातील १८१ डावात ४७.३ च्या सरासरीने ८१८१ धावा केल्या आहेत. त्याने कारकीर्दीत २३ शतके आणि ३५ अर्धशतके झळकावली आहेत. याशिवाय त्याची सर्वाधिक धावसंख्या २२७ धावा आहेत. त्याच्या कसोटी कारकीर्दीतील सर्वोच्च क्रमवारी ३ होती.
तसेच त्याने २००८ मध्ये ३ सामन्यात इंग्लंडचे नेतृत्वही केले आहे. यात ३ सामन्यांपैकी १ सामना इंग्लंडने जिंकला, १ सामना पराभूत झाला असून १ सामना अनिर्णित राहिला आहे.
१. ग्रॅमी स्मिथ (Graeme Smith)
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने आपल्या कसोटी कारकीर्दीत, ९ हजाराहून अधिक धावा, २७ शतके आणि ५ दुहेरी शतके अशी जबदस्त कामगिरी करूनही कसोटी क्रमवारी प्रथम क्रमांक गाठू शकला नाही. त्याने कर्णधार म्हणून जिंकलेल्या सामन्यात सर्वाधिक १५ शतके केली. तसेच कर्णधार म्हणून खेळलेल्या १०९ कसोटी सामन्यात त्याने सर्वाधिक ८६५९ धावा केल्या आहेत. तर एकूण ११७ सामन्यात त्याने ९२६५ धावा केल्या आहेत.
त्याच्या कारकीर्दीत तो दुसऱ्या क्रमांकापर्यंत पोचला होता, जो त्याने २०१० मध्ये प्राप्त केला होता. त्यावेळी गौतम गंभीर पहिल्या क्रमांकावर होता. नंतरही स्मिथला कधी अव्वल क्रमांकावर पोहचता आले नाही.