सिडनीत पहिला वनडे सामना गमावल्यानंतर भारतीय संघाकडून चाहत्यांना दुसर्या वनडे सामन्यात पराभवाची परतफेड करण्याची अशा होती, मात्र असे घडले नाही. रविवारी(29 नोव्हेंबर) झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाला निराशाजनक पराभवाला सामोरे जाताना 3 सामन्यांची वनडे मालिका सुद्धा गमवावी लागली.
रविवारी ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 389 धावांचा डोंगर उभा केला होता, बदल्यात भारतीय संघ 338 धावाचं करू शकला. त्यामुळे भारताला 51 धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आज आपण या लेखनातून कोणत्या पाच कारणामुळे भारताने मालिका गमावली याबद्दल जाणून घेणार आहोत.
1.भारतीय गोलंदाजांची खराब कामगिरी
भारतीय संघाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण ठरली त्यांची गोलंदाजी. पहिल्या वनडे सामन्यात 374 धावा दिल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी दुसर्या सामन्यातसुद्धा खराब कामगिरी केली. यावेळी त्यांनी 389 धावा दिल्या. बुमराह, शमी, चहल सारखे गोलंदाज आयपीएल 2020 मध्ये हिरो ठरले होते, मात्र ऑस्ट्रेलिया दौर्यावर येताच या सर्वांची कामगिरी खालवली आहे. या कारणामुळे भारताने मालिका गमावली.
2. ऑस्ट्रेलियाची धारदार गोलंदाजी
एका बाजूला भारताची गोलंदाजी सुमार झाली, तर दुसर्या बाजूला ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी धारधार ठरली. सिडनी क्रिकेट मैदानाच्या पाटा धावपट्टीवर जोस हेझलवूड, पॅट कमिन्स आणि ऍडम झम्पा यांनी कित्येक निर्धाव चेंडू टाकले, त्यामुळे भारतीय संघावर दबाव वाढला. दुसर्या सामन्यात कमिन्सने 3 गडी बाद केले तर झंम्पा आणि हेझलवूड यांनी 2-2 गडी बाद केले.
3. भारताचे खराब क्षेत्ररक्षण
भारताच्या पराभवाचे आणि ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे मुख्य कारण क्षेत्ररक्षण राहिले. पाटा खेळपट्टीवर नेहमी उत्तम क्षेत्ररक्षण सामना बदलून टाकते आणि ऑस्ट्रेलियाने असेच केले. एकाबाजूला भारतीय खेळाडू झेल सोडत होते तर दुसर्या बाजूला ऑस्ट्रेलियाचे खेळाडू अप्रतिम झेल घेत होते. स्मिथने अय्यरचा आणि हेन्रीक्सने विराटचा अफलातून झेल घेत सामना आपल्या बाजूला झुकवला.
4. भारतीय फलंदाजीतील चूका
जरी दुसर्या सामन्यात 390 धावांचे मोठे लक्ष्य होते, तरी भारताच्या फलंदाजांनी ज्या चुका केल्या त्या दुर्लक्षित करुन चालणार नाहीत. शिखर धवन आणि मयंक अगरवाल यांनी चांगली सुरवात करुनही ते मोठी खेळी करु शकले नाहीत. त्यांच्यानंतर फलंदाजीला येणाऱ्या फलंदाजांचीही कामगिरी खास राहिली नाही. भारताचे फलंदाज खेळपट्टीवर स्थिरावल्यावर विकेट घालवत राहिले. याचा परिणाम भारताने मालिका गमावली.
5. दोन्ही सामन्यात नाणेफेक गमावली
नाणेफेक हारणे हे सुद्धा पराभवाचे मोठे कारण आहे. सिडनीचे खेळपट्टी मागील काही वर्षापासून फलंदाजीसाठी उत्तम आहे. दिवस-रात्र सामन्यात या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करणे म्हणजे एक प्रकारे विजयाची हमी आहे. विराट कोहलीने दोन्ही सामन्यात नाणेफेक गमावली आणि ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. दुपारी जेव्हा खेळपट्टी सुकलेली असते तेव्हा फलंदाजांना धावा काढणे सोपे जाते परंतु संध्याकाळी खेळपट्टी ओली होती, त्यावेळी धावा काढणे अवघड जाते.
महत्त्वाच्या बातम्या –
‘त्याला’ गोलंदाजी दिल्याने योजनेचा खुलासा, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर विराटचे भाष्य
स्टीव्ह स्मिथ भारतीय संघासाठी ‘भीतीदायक’, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूची प्रतिक्रिया
बीसीसीआयने घडवून आणला विराट, रोहित आणि शास्त्रींमध्ये कॉन्फरन्स कॉलद्वारे संवाद?