ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक मालिका विजय मिळवल्यानंतर भारतीय संघासमोर मायदेशात इंग्लंड संघाचे आव्हान असणार आहे. आगामी 5 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात इंग्लंड संघ बहुचर्चित 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारतीय संघाला विजयाचा दावेदार मानले जात असले तरी, नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंका दौऱ्यात इंग्लंडने शानदार कामगिरी करत 2-0 ने विजय मिळवला होता. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये जबरदस्त संघर्ष बघायला मिळणार हे जवळपास निश्चित आहे. आपण या लेखात बघणार आहोत अशा 6 बाबी ज्यामुळे भारत इंग्लंड मालिकेबद्दल उत्सुकता आणखीनच वाढली आहे.
1) विराट कोहली व जेम्स अँडरसनमधील लढत –
या मालिकेत सर्वांच्या नजरा भारतीय कर्णधार विराट कोहली व इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसन यांच्यामधील लढतीवर असणार आहे. इंग्लंडमध्ये 2014 साली झालेल्या मालिकेत अँडरसनने विराटवर दबाव आणला होता. त्या मालिकेत विराटला 10 डावांमध्ये केवळ 134 धावा बनवता आल्या होत्या. 2014 च्या इंग्लंड दौऱ्यानंतर मात्र विराटने आपल्या फलंदाजीचे कौशल्य दाखवत अँडरसन विरुद्ध उत्तम कामगिरी केलेली आहे. आगामी 5 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या मालिकेत या दोन तगड्या खेळाडूंचा संघर्ष क्रिकेट रसिकांना बघायला मिळणार आहे.
2) भारतीय संघाला निर्माण करावा लागेल योग्य समतोल –
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यामध्ये स्थान मिळवण्याचे मोठे आव्हान भारत आणि इंग्लंड संघासमोर असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी ही अगामी कसोटी मालिका फार महत्त्वाची आहे. त्यामुळे भारताला 11 जणांच्या संघात योग्य समतोल राखावा लागणार आहे. त्यामुळे हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की कर्णधार विराट कोहली अजिंक्य रहाणेप्रमाणे 5 गोलंदाजांसह मैदानात उतरतो अथवा 4 प्रमुख गोलंदाजांना संधी देतो.
3) रिषभ पंत केवळ फलंदाज म्हणून खेळणार अथवा यष्टीरक्षक –
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की भारताच्या ऑस्ट्रेलियामधील मालिका विजयाचा नायक रिषभ पंत यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळतो अथवा केवळ फलंदाज म्हणून. पंतची भारतातील फिरकीला अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीवर यष्टिरक्षक म्हणून कामगिरी तितकीशी समाधानकारक नसल्याने त्याच्या संघातील स्थानाबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. अनेक दिग्गजांनी पंतला केवळ फलंदाज म्हणून खेळवण्याचा देखील सल्ला दिला आहे.
४)जो रुटच्या कामगिरीकडे असेल सर्वांची नजर –
इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूटने श्रीलंकेविरुद्ध शानदार कामगिरी केल्यामुळे सर्वांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या आहेत. मागील काही काळापासून रुटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरीचा अभाव जाणवत होता. मात्र, श्रीलंकेत द्विशतक व त्यानंतर शतक ठोकल्यामुळे रुट फॉर्ममध्ये आला असून आगामी मालिकेत त्याच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष राहाणार आहे. तसेच भारताविरुद्धचा पहिला सामना रुटचा कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना असणार आहे.
५) इंग्लंडच्या फिरकीपटूंपुढे असेल भारतीय फलंदाजीचे आव्हान –
इंग्लंडकडे जॅक लीच व डॉम बेस हे दोन युवा फिरकीपटू आहेत. इंग्लंडला भारतात मालिका विजयाचे स्वप्न साकार करण्यासाठी या दोन्ही फिरकीपटूंना शानदार कामगिरी करावी लागेल. दोन्ही फिरकीपटूंचा हा पहिलाच भारत दौरा असून त्यांच्या समोर भारताच्या दिग्गज फलंदाजीचे आव्हान असणार आहे.
६) युवा आहे इंग्लंडची फलंदाजी –
इंग्लंडच्या फलंदाजीमध्ये फारसा अनुभव नाही. अनेक खेळाडूंचा हा पहिलाच भारतीय दौरा असणार आहे. अशा परिस्थितीत संघातील अनुभवी खेळाडू जो रूट व बेन स्टोक्स यांना इतर खेळाडूंना सोबत घेऊन उत्तम कामगिरी करावी लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बाबो.. ही कसली स्टाईल! टी१० लीगमधील खेळाडूची गोलंदाजी खूपच विचित्र, व्हिडिओ पाहून व्हाल थक्क
‘तुम्ही घर चालवण्यासाठी खोट्याची साथ देता’, ‘त्या’ ट्वीटमुळे घेतला जातोय रहाणेचा समाचार
आयपीएल एकत्र खेळतो, परंतु परदेशी खेळाडूंना आमच्या सर्व युक्त्या सांगत नाही- अजिंक्य रहाणे