कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगात बरेच दिवस कोणत्याही क्रीडा स्पर्धांचे आयोजन होऊ शकले नाही. मात्र, सर्व खबरदारी घेऊन सर्वच क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. मात्र, सर्व काळजी घेऊनही काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. यातच दोन भारतीय कुस्तीपटूंचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
डोपिंग अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे झालेल्या चार वर्षांच्या बंदीनंतर कुस्तीपटू नरसिंग यादव पुनरागमन करण्यास सज्ज होता. पहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्यासाठी तो कसून सराव करत होता. याचदरम्यान शनिवारी (28 नोव्हेंबर) त्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.
कुस्तीपटू नरसिंग यादवसह ग्रीको-रोमन ग्रॅपलर गुरप्रीत सिंग यालाही कोरोनाची लागण झाली आहे.
नरसिंग 12 ते 18 डिसेंबरदरम्यान बेलग्रेड येथे होणाऱ्या वैयक्तिक विश्वचषक स्पर्धेत भाग घेणार आहे. 74 किलो वजनगटात जितेंद्र किन्हाच्या जागी त्याची निवड झाली आहे.
भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (एसएआय) आपल्या निवेदनात म्हटले की, “नरसिंग यादव (74 किलो) आणि गुरप्रीत सिंग (77 किलो) यांच्यात कोरोनाची कोणत्याही प्रकारचे लक्षण आढळली नाहीत.”
“या दोन कुस्तीपटूव्यतिरिक्त फिजिओथेरपिस्ट विशाल राय यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या तिघांमध्येही कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाही. परंतु खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे,” असेही एसएआयच्या निवेदनात सांगण्यात आले होते.
सप्टेंबरच्या सुरूवातीला दीपक पुनिया (86 किलो), नवीन (65 किलो) आणि कृष्णा (125 किलो) या तीन ज्येष्ठ कुस्तीपटूंचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.