भारतीय संघाने आज ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. तसेच या विजयासह २-१ अशा फरकाने ऑस्ट्रेलियन भूमीवरील आपला सलग दुसरा कसोटी मालिका विजय नोंदवला. हा विजय भारतीय संघासाठी अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरला. मात्र या विजयासह एक विलक्षण योगायोग देखील समोर आला आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ १९८८ पासून ब्रिस्बेनच्या मैदानावर पराभूत झालेला नव्हता. नोव्हेंबर १९८८ मध्ये वेस्ट इंडिजने ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता, त्यांनतर या मैदानावरील सगळे सामने ऑस्ट्रेलियाने एकतर जिंकले होते नाहीतर अनिर्णीत ठेवले होते. नोव्हेंबर १९८८ मध्ये जेव्हा वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला या मैदानावर पराभूत केले होते त्याच दरम्यान भारताचा विद्यमान कर्णधार विराट कोहली याचा जन्म झाला होता.
आता ११ जानेवारी २०२१ रोजी विराटच्या मुलीचा जन्म झाला आहे. योगायोगाची गोष्ट म्हणजे पुन्हा तसेच घडले आणि ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव झाला. आता ब्रिस्बेन टेस्ट जिंकून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकून अजिंक्य रहाणेच्या संघाने विराटला मुलीच्या जन्माच्या निमित्ताने सर्वोत्तम भेट दिली आहे. मात्र त्याचप्रमाणे कोहलींच्या घरात पाळणा हलताच ब्रिस्बेनवर ऑस्ट्रेलियाचा पराभव झाल्याचा योगायोग देखील समोर आला आहे.
दरम्यान, यातील योगायोगाचा भाग सोडला तरी भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने हा विजय अतिशय अभिमानास्पद आहे. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय संघानेजबरदस्त लढाऊ वृत्ती दाखवत या मालिकेत यश मिळवले. या मालिका विजयाचा भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतील स्थान पक्के करण्याच्या दृष्टीने देखील फायदा होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी खोऱ्याने धावा काढत विजय मिळवणारे संघ, भारताचाही समावेश
टिम पेन ऐवजी ‘या’ खेळाडूला कर्णधार करा, इयान हिली यांनी केली मागणी