पुणे। अंतल्या येथे पार पडलेल्या जागतिक 7 वर्षाखालील शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत आरुष डोळस याने लक्षवेधी कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. स्पर्धेत सातवे मानांकन असलेल्या आरुष याने 9 सामन्यांमध्ये 8 गुणांसह सुवर्णपदकाची कमाई केली.
आरुषने आपली 7सामन्यांमध्ये आपली विजयी मालिका कायम ठेवत रशिया, टर्की, इंग्लंड, जॉर्जिया, कझाकस्तान, अझरबैजान येथील खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवला. त्याने आपल्या खेळीत चतुराई व उत्तम खेळी करत प्रतिस्पर्धी खेळाडूंवर विजय मिळवला. शेवटून दुसऱ्या फेरीत कझाकस्तानच्या अब्दसत्तार आलिशेर याच्याकडून 4 तास आणि 60 चालींपर्यंत रंगलेल्या कडव्या झुंजीनंतर पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे विजेतेपद पटकाविण्याच्या स्वप्नाला जबरदस्त हादरा बसला होता. परंतु अंतिम फेरीत आरुषने आपल्या प्रतिस्पर्ध्यावर 4 तास आणि 83 चालींपर्यंत रंगलेल्या डावात विजय मिळवित त्याने अर्ध्या गुणाच्या फरकाने आपल्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
आरुषसह निवाण खंडादिया या आणखी एका पुण्याच्या खेळाडूने 6.5 गुणांसह कांस्य पदक पटकावले. या स्पर्धेत 12 विविध देशातून एकूण 38 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला होता. आरुष हा 7 वर्षांखालील गटात राज्यांतील उपविजेता आहे आणि त्याचे फिडे मानांकन 1035 असे आहे. आरुष बिशप्स शाळेत दुसरी इयत्तेत शिकत असून कुंटे चेस अकादमी येथे मृणालिनी कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.