आज (2 फेब्रुवारी ) भारत विरुद्ध इंग्लंडच्या पाचव्या टी20 सामन्यात अभिषेक शर्माने खळबळ उडवून दिली. त्याने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडच्या गोलंदाजांना धोधो धुतले. सलामीवीर म्हणून मैदानात उतरलेल्या अभिषेकने 54 चेंडूत 7 चौकार आणि 13 षटकारांसह 135 धावा केल्या. भारतासाठी ही सर्वात मोठी टी20 खेळी आहे. त्याने शुभमन गिलचा विक्रम मोडला, ज्याने 2023 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध नाबाद 126 धावा केल्या होत्या.
अभिषेकने फक्त 37 चेंडूत आपले दुसरे शतक पूर्ण केले. तो टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारा दुसरा भारतीय खेळाडू बनला आहे. टी20 फॉरमॅटमध्ये सर्वात जलद शतक ठोकणाऱ्या पूर्ण सदस्य राष्ट्रांच्या खेळाडूंच्या यादीत अभिषेक तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
अभिषेक हा टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय खेळाडू बनला आहे. त्याने 13 षटकार मारून रोहितचा विक्रम मोडला. हिटमॅनने 10 षटकार मारण्याचा पराक्रम केला होता. 2024चा टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर रोहितने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मैदानावर आल्यानंतर सलामीवीर अभिषेकने दोन षटके संयम दाखवला पण तिसऱ्या षटकापासून आक्रमक पवित्रा स्वीकारला. ब्रायडन कार्सने टाकलेल्या 11व्या षटकातील पहिल्या चेंडूवर एक धाव घेऊन त्याने शतक पूर्ण केले.
अभिषेक आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वात कमी षटकांमध्ये 100 धावांचा टप्पा गाठणारा क्रिकेटपटू बनला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू क्विंटन डी कॉकचा विक्रम मोडला. अभिषेकने 10.1 षटकांत शतक झळकावले तर डी कॉकने 10.2 षटकांत शतक झळकावले होते. अभिषेकला 18 व्या षटकात जोफ्रा आर्चरने बाद केले. अभिषेकच्या दुसऱ्या टी20 शतकामुळे भारताने 247/8 धावा केल्या. टी20 फॉर्मेटमध्ये भारताचा हा चौथा सर्वोच्च स्कोअर आहे.
सर्वात जलद टी20 शतक (चेंडू)
35 – डेव्हिड मिलर विरुद्ध बांगलादेश, 2017
35– रोहित शर्मा विरुद्ध श्रीलंका, 2017
37– अभिषेक शर्मा विरुद्ध इंग्लंड, 2025
39 – जॉन्सन चार्ल्स विरुद्ध झिम्बाब्वे, 2023
हेही वाचा :
जाणून घ्या कोण आहे गोंगाडी त्रिशा? जी ठरली अंडर19 महिला टी20 वर्ल्डकपची सर्वोत्तम खेळाडू
गोंगाडी त्रिशाने घडवला इतिहास; रचला ‘हा’ नवा विक्रम
IND vs ENG; अभिषेक शर्माचे झंझावाती शतक, भारताचे इंग्लंडसमोर 248 धावांचे आव्हान