शारजाह। टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील १७ वा सामना स्कॉटलंड विरुद्ध अफगाणिस्तान संघात पार पडला. अफगाणिस्तान संघाने हा सामना १३० धावांनी जिंकला. अफगाणिस्तानच्या विजयात मुजीब उर रेहमान आणि राशिद खान या फिरकीपटूंनी महत्त्वाचा वाटा उचलला.
या विजयासह अफगाणिस्तानने २ गुण मिळवून गट ब च्या गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवला आहे. या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान आहे. त्यांनीही एक सामना जिंकला आहे. पण अफगाणिस्तानने नेटरनरेटच्या जोरावर पाकिस्तानला मागे टाकले आहे. या दोन संघांपाठोपाठ या गटात सध्या न्यूझीलंड, नामिबिया, भारत आणि स्कॉटलंड आहे.
मुजीब-राशिदने गुंडाळला स्कॉटलंडचा डाव
या सामन्यात अफगाणिस्तानने स्कॉटलंडला १९१ धावांचे आव्हान दिले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना स्कॉटलंडचा संघ १०.२ षटकांत ६० धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे अफगाणिस्तानने हा सामना मोठ्या फरकाने जिंकला. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रेहमानने ४ षटकांत २० धावा देत ५ विकेट्स घेतल्या. तर, राशिदने २.२ षटकांत ९ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. याशिवाय एक विकेट नवीन उल हकने घेतली.
स्कॉटलंडकडून जॉर्ज मुन्से आणि केली कोएत्झर या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली होती. पण, त्यांना चांगल्या सुरुवातीचा फायदा घेता आला नाही. या दोघांनाही मुजीबने त्रिफळाचीत केले. मुन्सेने २५ आणि कोएत्झरने १० धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त केवळ ख्रिस ग्रिव्ह्सला दोन आकडी धावसंख्या पार करता आली. त्याने १२ धावा केल्या. अन्य खेळाडू एकेरी धावसंख्येवर बाद झाले. विशेष म्हणजे स्कॉटलंडचे तीन, चार, पाच आणि सहा क्रमांकाचे फलंदाज शुन्यावर माघारी परतले.
स्कॉटलंडच्या फलंदाजांना अफगाणिस्तानची फिरकी गोलंदाजी खेळताना प्रचंड संघर्ष करावा लागला. मुजीब आणि राशिदने मिळून घेतलेल्या ९ विकेट्स या केवळ पायचीत आणि त्रिफळाचीत या दोन स्वरुपातीलच होत्या.
अफगाणिस्तानची दमदार फलंदाजी
या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांनी हा निर्णय योग्य देखील ठरवला. अफगाणिस्तानने २० षटकांत ४ बाद १९० धावा केल्या. अफगाणिस्तानकडून हजरतुल्लाह झझाई आणि मोहम्मद शेहजाद या सलामीवीरांनी अर्धशतकी सलामी दिली. पण, अर्धशतकी भागीदारी रचल्यानंतर शेहजाद २२ धावांवर बाद झाला. काहीवेळात झझाई देखील ३० चेंडूत ४४ धावा करुन बाद झाला.
पण, यानंतर रेहमानुल्ला गुरबाज आणि नजीबुल्लाह झाद्रान यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी रचली. त्यामुळे अफगाणिस्तानला १५० धावांचा टप्पा सहज पार करता आला होता. या दोघांनी जोडी गुरबाजला जोश डेवीने बाद केल्याने तुटली. गुरबाजने ४६ धावांची खेळी केली. तर, झाद्रानने अर्धशतक पूर्ण केले. त्याने ३४ चेंडूत ५९ धावा केल्या. या खेळीत त्याने ५ चौकार आणि ३ षटकार मारले. तो डावाच्या अखेरच्या चेंडूवर बाद झाला. मोहम्मद नबी ४ चेंडूत ११ धावा करुन नाबाद राहिला.
स्कॉटलंडकडून सफियान शरिफने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर, जोश डेवी आणि मार्क वॅट यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
‘पाजी, टीव्ही फोडला नाही ना?’ हरभजन-अख्तरच्या वादात ‘या’ खेळाडूची उडी
‘या’ पाच प्रमुख कारणांमुळे विश्वचषकात पहिल्यांदाच पाकिस्तानने केला भारताचा पराभव
तो पुन्हा आला! ‘मुझे मारो’ वाल्या पाकिस्तानी चाहत्याचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल