भारत आणि ऑस्ट्रलिया संघात होणारा तिसरा कसोटी सामना अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर होणारा हा सामना जिंकत भारत मालिकेत आघाडी मिळवण्याच्या प्रयत्नात असेल; तर ऑस्ट्रेलिया संघ मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी झगडताना दिसेल. अशात या सामन्यात भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेकडे कॅप्टनकूल एमएस धोनीच्या एका विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे.
रहाणेच्या नेतृत्त्वाखाली भारताने जिंकलेत तीन कसोटी सामने
रहाणेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीत भारतीय संघाला ८ विकेट्सने विजय मिळवून दिला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघ अवघ्या १९५ धावांवर गारद झाला होता. प्रत्युत्तरात रहाणेच्या झुंजार शतकामुळे भारताने पहिल्या डावात १३१ धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया संघाने भारताला अवघ्या ६९ धावांचे आव्हान दिले. रहाणे आणि शुबमन गिल यांनी मिळून १६ षटकात ऑस्ट्रेलियाचे आव्हान पूर्ण करत सामना खिशात घातला. रहाणेच्या नेतृत्त्वाखाली भारतीय कसोटी संघाने मिळवलेला हा सलग तिसरा विजय होता.
तत्पुर्वी २०१७ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात रहाणेने भारतीय संघाचे पहिल्यांदा नेतृत्त्व केले होते. २५ मार्च ते २८ मार्च या कालावधीत धरमशाला स्टेडिमयवर झालेल्या या सामन्यात भारताने ८ विकेट्सने विजयी पताका झळकावली होती. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ३०० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ३२ धावांची आघाडी मिळवली होती.
पुढे दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलिया संघ १३७ धावांवर गारद झाला. त्यानंतर भारताने अवघ्या २४ षटकात ऑस्ट्रेलियाचे १०६ धावांचे लक्ष्य पूर्ण केले होते. अशाप्रकारे रहाणेने आपल्या नेतृत्त्वाखालील पहिल्याच कसोटी सामन्यात भारताला विजय मिळवून दिला होता.
एवढेच नव्हे तर, २०१८ मध्ये अफगानिस्तान विरुद्ध झालेल्या एकमेव कसोटी सामन्यातही रहाणेने भारताचे नेतृत्व करताना संघाच्या पारड्यात विजयाची भर घातली होती. १४ जून ते १५ जून २०१८ दरम्यान बेंगळुरू येथे झालेला हा सामना भारताने एक डाव आणि २६२ धावांनी जिंकला होता. हा रहाणेच्या नेतृत्त्वाखालील दुसरा कसोटी सामना होता.
सिडनी कसोटी जिंकत करु शकतो धोनीच्या विक्रमाची बरोबरी
अशाप्रकारे रहाणेने आतापर्यंत त्याच्या नेतृत्त्वाखालील पहिल्या तीन कसोटी सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. जर त्याने येता सिडनीतील तिसरा कसोटी सामनाही जिंकला; तर तो धोनीच्या नेतृत्त्वातील खास विक्रमाची बरोबरी करेल. धोनीने त्याच्या नेतृत्त्वाखाली पहिल्या ४ कसोटी सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे कर्णधार म्हणून पहिले ४ कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम करणारा तो सध्यातरी एकमेव भारतीय कर्णधार आहे.
संपणार ४३ वर्षांचा दुष्काळ
यापुर्वी १९७८ साली भारतीय संघाने बिशन सिंग बेदी यांच्या नेतृत्त्वाखाली सिडनी येथे झालेल्या कसोटीत ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत केले होते. एक डाव आणि २ धावांनी भारताने त्या सामन्यात विजयी पताका झळकावली होती. त्यानंतर आतापर्यंत भारतीय संघ सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करू शकलेला नाही. अशात जर रहाणेने सिडनीत होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर मात केली तर ४२ वर्षांचा दुष्काळ संपेल.
महत्त्वाच्या बातम्या-
अजिंक्य रहाणेसाठी डोकेदुखी, शार्दुल आणि सैनीपैकी कोणाची करावी निवड?
ऑस्ट्रेलिया-भारत पडले मागे; न्यूझीलंड कसोटीचा नवा किंग
ऑस्ट्रेलियन माध्यमांनी कोहली-पंड्यावर प्रोटोकॉल तोडल्याचा केलेला आरोप कितपत खरा, घ्या जाणून