10 जूनला महिला आशिया चषकाचा भारत विरुद्ध बांग्लादेश असा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात बांग्लादेशने भारतावर 3 विकेटने विजय मिळवत आशिया चषकावर पहिल्यांदाच नाव कोरले.
बांग्लादेशच्या या विजयात अंजू जैन या माजी क्रिकेटपटूचा मोठा वाटा आहे. त्या भारताच्या माजी यष्टीरक्षक फलंदाज असुन एक महिन्यापूर्वीच त्यांनी बांग्लादेश महिला संघाचे प्रशिक्षणपद हाती घेतले आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली बांग्लादेश महिला संघाने आशिया चषकात उत्तम कामगिरी केली आहे. बांग्लादेशच्या या विजयाबद्दल त्या म्हणाल्या, “बांग्लादेशला अंतिम सामन्यात बघून आणि विजेतेपद मिळवताना बघून आनंद झाला. यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले होते आणि योजनाही चांगल्या पद्धतीने आमलात आणल्या.”
“भारत चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्यामुळे मिताली राज, हरमनप्रीत कौर, स्म्रीती मानधना आणि फिरकी गोलंदाजांविरुद्ध योजना बनवण्यासाठी भरपूर तयारीची गरज होती. आता आमचे पुढचे लक्ष टी20 विश्वचषकासाठी पात्र ठरणे हे आहे. त्याची नोव्हेंबरमध्ये पात्रता फेरी होणार आहे.”
त्या पुढे म्हणाल्या की बांग्लादेशचा पुरुष संघ अफगाणिस्तानविरुद्ध पराभूत झाला होता पण महिलांच्या विजयामुळे पुन्हा बांग्लादेशच्या चहात्यांना आनंद झाला आहे. ज्याप्रकारे महिलांनी दोनवेळेस भारताला हरवले त्यातून त्यांनी त्यांची क्षमता आणि जिद्द दाखवली आहे. तसेच भारताविरुद्ध खेळण्यासाठी आम्ही योजना आखल्या होत्या.
अंजू यांच्या बरोबरच बांग्लादेशच्या सपोर्ट स्टाफमध्ये दोन महिला आहेत. यात देविका पळशिकर या सहाय्यक प्रशिक्षक आहेत आणि अनुजा दळवी या फिजिओथेरपिस्ट आहेत.
अंजू जैन यांच्याबद्दल थोडेसे:
2017 च्या मोसमात अंजू विदर्भ महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षक होत्या. तसेच त्यांनी या आधी भारतीय संघाचेही प्रशिक्षकपद संभाळले आहे.
अंजू या 2012च्या महिला टी20 विश्वचषकात आणि 2013 च्या विश्वचषकावेळी भारतीय संघाच्या प्रशिक्षक होत्या.
त्या बांग्लादेशाचे प्रशिक्षकपद संभाळणाऱ्या दुसऱ्या भारतीय महिला क्रिकेटपटू आहेत. याआधी भारताच्या माजी कर्णधार ममता माबेन या 2011 आणि 2013 मध्ये बांग्लादेशच्या प्रशिक्षक होत्या.
अंजू यांनी भारताकडून 8 कसोटीत खेळताना 36.75 च्या सरासरीने 441 धावा केल्या आहेत. तसेच 65 वनडे सामन्यात 29.81 च्या सरासरीने 1729 धावा केल्या आहेत.
भारताच्या सर्वात यशस्वी यष्टीरक्षक:
अंजू या भारताच्या वनडे आणि कसोटीमधील सर्वात यशस्वी यष्टीरक्षक आहेत. त्यांनी वनडेत यष्टीरक्षक म्हणून भारताकडून सर्वाधिक 81 विकेट घेतल्या आहेत. यात त्यांनी 30 झेल तर 51 यष्टीचित केले आहेत.
याबरोबरच त्यांच्या नावावर वनडेत सर्वाधिक यष्टीचित करण्याचाही विक्रम आहे.
तसेच त्यांनी कसोटीत 8 यष्टीचीत आणि 15 झेल असे एकूण यष्टीमागे 23 विकेट घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–चालू सामन्यातच एयर अॅम्बुलन्स थेट क्रिकेटच्या मैदानात
–भारतीय गोलंदाजामुळेच भारतीय संघ येणार कसोटी सामन्यात अडचणीत!
–इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय फलंदाजांसाठी ही आहे मोठी बातमी
–विजेतेपदाची आठवण म्हणून बनवुन घेतला चक्क टॅटू
–टीम इंडियातून फिटनेसमुळे संजू सॅमसन आऊट, हा मोठा खेळाडू इन!