आयसीसी विश्वचषकाला आता तीन महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिला आहे. त्यामुळे क्रिकेटविश्वात विश्वचषकाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. प्रत्येक संघही अंतिम तयारीच्या दृष्टीने विचार करत आहे. तसेच अनेक माजी क्रिकेटपटूंनी या विश्वचषकाबद्दल तर्कवितर्क लावले आहेत.
यात आता भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराचाही समावेश झाला आहे. नेहराने या विश्वचषकात भारतासाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी महत्त्वाचा खेळाडू ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
शमी यावर्षी चांगल्या लयीत खेळत आहे. त्याने शनिवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यातही चांगली कामगिरी केली होती. या सामन्यात त्याने 10 षटकात 42 धावा देत 2 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने मॅक्सवेल आणि ऍश्टन टर्नरला बाद केले.
क्रिकेटनेक्स्टने दिलेल्या वृत्तानुसार शमीबद्दल नेहरा म्हणाला, ‘मोहम्मद शमीने फक्त या मालिकेतच नाही तर मागील दिडवर्षापासून प्रभावित केले आहे. मी तर म्हणेल दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून तो प्रभावित करत आहे. कसोटीमध्ये त्याने चांगली गोलंदाजी केली. तसेच मोठे स्पेलही टाकले. त्याचा फिटनेसही सध्या चांगला आहे.’
तसेच नेहरा पुढे म्हणाला, ‘तो भारतासाठी पुढे महत्त्वाचा ठरणार आहे.’
शमीने 2019 मध्ये आत्तापर्यंत भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 9 सामन्यात 18 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच तो 2018 मध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर होता. त्याने या वर्षात 14 सामन्यात 50 विकेट्स घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
–काल क्रिकेटविश्वातील या ५ ट्वीटची झाली सर्वाधिक चर्चा
–म्हणून मराठमोळ्या केदार जाधवने मानले कूल धोनीचे आभार
–एकवेळ बीसीसीआयने नाकारलेला कुंबळे आता थेट आयसीसीत