मुंबई । दोन वर्षांपूर्वी रोह्यात भारत श्रीचे अभूतपूर्व आयोजन करणारे क्रीडाप्रेमी आणि नवनियुक्त आमदार अनिकेत तटकरे आता आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजनाचे शिवधनुष्य पेलणार आहेत.
येत्या ऑक्टोबर महिन्यात होणार्या आशिया श्री शरीरसौष्ठव स्पर्धेच्या ऐतिहासिक आणि न भूतो न भविष्यति अशा आयोजनासाठी या स्पर्धेच्या आयोजन समितीचे अध्यक्षपद अनिकेत तटकरे यांनी आमदारकी शपथ घेताच स्वीकारले.
पुण्याच्या बालेवाडीत 2 ते 7ऑक्टोबरदरम्यान ही स्पर्धा रंगणार असून यात आशियातील तब्बल 33 देश सहभागी होतील.
क्रीडा स्पर्धा आयोजनात नेहमीच पुढाकार घेणार्या अनिकेत तटकरे यांनी दोन वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्याच्या छोट्याशा रोह्यात अशक्य आणि अवघड वाटणार्या भारत श्रीचे मोठ्या दिमाखात आयोजन करून दाखवले होते.
तब्बल 30 हजारांपेक्षा अधिक क्रीडाप्रेमींची उपस्थिती लाभलेल्या नवव्या भारत श्री स्पर्धेची प्राथमिक फेरीसुद्धा त्यांनी खुल्या मैदानात घेण्याची किमया करून दाखवली होती.
यापूर्वी कधीही प्राथमिक फेरी खुल्या मैदानात पार पडली नव्हती. त्यांनी रोह्यातील स्पर्धेच्या आयोजनाबाबत कुठेही हात आखडता घेतला नव्हता. आता त्यांचा हाच दांडगा अनुभव पुण्यातील आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत संघटनेच्या उपयोगी पडणार आहे.
नवनियुक्त आमदार अनिकेत तटकरे यांचे क्रीडाप्रेम पाहाता भारतीय शरीरसौष्ठव महासंघाचे (आयबीबीएफ) सरचिटणीस चेतन पाठारे यांनी आशिया श्री आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेच्या आयोजन समितीचे अध्यक्षपद भूषविण्याची विनंती करताच त्यांनी ते मानाने स्वीकारले.
एवढेच नव्हे तर पुण्याच्या बालेवाडी येथे होणारी ही स्पर्धा संस्मरणीय करू, असे वचनही त्यांनी दिले. शरीरसौष्ठवपटूंना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देऊ. तसेच स्पर्धेची अंतिम फेरी ग्लॅमरस आणि डोळे दिपवणारी असेल, असा विश्वासही त्यांनी पाठारे यांना दिला.
रोह्यात अपेक्षित पायाभूत सोयीसुविधा नसतानाही भारत श्रीत आपण आयोजनाचे सर्वोत्तम स्तर गाठले होते. आशिया श्रीतर पुण्यात आहे. 33 देशांतून येणार्या खेळाडूंसह पदाधिकारी आणि क्रीडाप्रेमीही या स्पर्धेची मुक्तकंठाने प्रशंसा करतील, भारताच्या आदरातिथ्याने सारे परदेशी आणि देशी खेळाडूही भारावतील, असे शब्द तटकरे यांनी पाठारे यांना दिले.
यंदा आशिया श्री स्पर्धेत 33 देशांतील 400पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय खेळाडू पुण्यात दाखल होणार आहेत. या स्पर्धेत भारतासह अफगाणिस्तान, श्रीलंका,मालदीव, नेपाळ, भूतान या शेजारी देशांसह चीन, थायलंड, मलेशिया,सिंगापूर, इंडोनेशिया, मंगोलिया, चायनीज तैपेईसारख्या देशांतील भीमकाय देहयष्टीचे आंतरराष्ट्रीय मोठ्या संख्येने सामील होत असल्याची माहिती पाठारे यांनी दिली.
तटकरे यांनी आयोजन समितीचे अध्यक्षपद स्वीकारताच आयबीबीएफ आणि महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत. या आयोजन समितीत तटकरेंसह चेतन पाठारे, व्यायाममहर्षी मधुकरराव तळवलकर, प्रेमचंद डेगरा तसेच महाराष्ट्र संघटनेचे अॅड. विक्रम रोठे, मदन कडू, नंदू खानविलकर, राजेश सावंत, प्रशांत आपटे, सुनील शेगडे यांचा समावेश आहे.