गुवाहाटी । राज्य सायकलिंग संघटना, साई आणि केंद्र सरकारच्या सहकार्याने महाराष्ट्रात सायकलिंग अॅकॅडमी उघडण्यास तयार असून, त्यासाठी राज्य शासनाने एक पाऊल पुढे येण्याची गरज आहे, असे मत भारतीय सायकलिंग महासंघाचे खजिनदार प्रताप जाधव यांनी व्यक्त केले.
केंद्र सरकारच्या खेलो इंडिया या लहान वयापासून गुणवत्ता शोध घेणा-या स्पर्धेच्या तिस-या पर्वात सायकलिंगचा समावेश झाला. या पहिल्याच स्पर्धेत महाराष्ट्राने निर्विवाद वर्चस्व राखले. या संदर्भात त्यांच्याशी आसाम, गुवाहटी येथे संवाद साधला असता त्यांनी ही माहिती दिली.
कुमार स्तरावर गेली चार वर्षे महाराष्ट्राची कामगिरी चांगलीच आहे. त्यांना आणखी ताकदवान बनविण्यासाठी आम्ही साईकडे अॅकॅडमीसाठी प्रस्ताव पाठवला होता. म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आम्ही ही अॅकॅडमी सुरू करण्याच्या विचारात आहोत. राज्य शासनाबरोबर चर्चा सुरू आहे, मात्र त्याला अजून मुर्त स्वरुप येत नाही, असे जाधव यांनी सांगितले.
शासन पातळीवर अपयश आल्यास आम्ही खाजगीत अॅकॅडमी सुरू करण्याची तयारी ठेवल्याचेही ते म्हणाले. सायकलिंग अॅकॅडमीसाठी आवश्यक जागा शोधण्याचे काम सुरू असून काहींनी यामध्ये सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आपल्या मुलांना फायदा होणार असेल, तर अॅकॅडमी लवकर सुरू होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. साई आणि केंद्र सरकारने अॅकॅडमीसाठी महाराष्ट्र, त्रिवेंद्रम, रांची आणि जयपूर येथे मान्यता दिली आहे. यातील महाराष्ट्रातील अॅकॅडमीत महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड येथील खेळाडूंचा समावेश करण्यात येईल.
खेलो इंडियाच्या पहिल्याच स्पर्धेत मुलांनी मिळविलेल्या यशाचे त्यांनी कौतुक केले. ते म्हणाले, या मुलांनी मेहनत केली. त्याचे फळ त्यांना मिळाले. मुख्य म्हणजे कुमार वयात प्रशिक्षण घेत असताना अशा मोठ्या स्पर्धेचे व्यासपीठ मिळाल्यामुळे मुलांच्या स्पर्धात्मक अनुभवात वाढ होईल आणि त्यांना याचा भविष्याच्या वाटचालीसाठी खूप मोठा फायदा होईल, असे त्यांनी आवर्जुन सांगितले.