कोलकता, दिनांक 3 मार्च ः हिरो इंडियन सुपर लिगमध्ये रविवारी पाचव्या मोसमातील साखळी टप्याची सांगता करणाऱ्या लढतीत
एटीकेने दिल्ली डायनॅमोज एफसीला 2-1 असे हरविले. दोन वेळच्या माजी विजेत्या एटीकेसह दिल्लीचेही बाद फेरी गाठण्याचे आव्हान याआधीच संपले होते. या विजयासह एटीकने स्थानिक प्रेक्षकांनी दिलासा दिला.
विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर मध्यंतरास गोलशून्य बरोबरी होती. तिन्ही गोल दुसऱ्या सत्रात झाले. अंकित मुखर्जीने दोन मिनिटे बाकी असताना केलेला गोल निर्णायक ठरला.
चौथ्या मिनिटाला विनीत रायने पाठीमागून धक्का देत एदू गार्सियाला फाऊल केले. डावीकडे मध्य क्षेत्रात हे घडताच पंच एल. अजित मैतेई यांनी फ्री किक बहाल केली. ती गार्सियानेच घेतली. त्यावर जॉन जॉन्सन याने हेडिंग केले. चेंडू नेटच्या दिशेने जाऊ लागला. एका प्रतिस्पर्ध्याला लागून चेंडू पुन्हा जॉन्सनकडे आला. त्याने परत फटका मारला, पण चेंडू नेटच्या बाहेरील बाजूला लागला, पण तोपर्यंत जॉन्सनला ऑफसाईड ठरविण्यात आले होते.
एटीकेने सुरवात चांगली करीत चेंडूवर ताबा मिळविला होता. दिल्लीचा पहिला प्रयत्न रोमीओ फर्नांडीसने 11व्या मिनिटाला केला. त्याने बॉक्समधील सहकाऱ्याला पास देण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू फार जवळून आल्यामुळे एटीकेचा गोलरक्षक अरींदम भट्टाचार्य सहज बचाव करू शकला.
दोन मिनिटांनी अॅड्रीया कॅर्मोना याने पास मिळताच नेटमध्ये डाव्या पायाने चेंडू मारला. त्यावर रोमीओने प्रयत्न केला, पण तो फिनिशिंगअभावी चेंडू नेटपासून लांब गेला. एटीकेच्या कोमल थातलने 20व्या मिनिटाला चांगला प्रयत्न केला. त्याने मारलेला फटका चांगला होता, पण अगदी थोडी अचूकता कमी पडली.