सांगली। शनिवारी(१६ जानेवारी) सांगलीतील आटपाडी येथे क्रिकेटच्या मैदानावर एका युवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अतुल विष्णू पाटिल असे या युवकाचे नाव असून तो तासगाव तालुक्यातील ढवळी गावातील औषध विक्रेता होता. त्याचे वय ३५ वर्षे होते. त्याला ज्यावेळी हृदयविकाराचा झटका आला, तेव्हा तो यष्टीरक्षण करत होता.
सांगली जिल्ह्यात दरवर्षी केमिस्ट असोसिएशनच्या वतीने क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या जातात. यंदा या स्पर्धा आटपाडी येथे होत्या. त्यामुळे तासगाव तालुक्याच्या संघाकडून अतुल खेळत होते. त्यावेळी यष्टीरक्षण करताना त्यांना अचानक चक्कर आली. प्रथम दर्शनी त्यांना चेंडू लागला, असा अनेकांचा समज झाला. मात्र, त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्यावर उपचार करण्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला असल्याचे समोर आले. ही घटना शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास घटली.
महत्त्वाचे म्हणजे अतुल हे ढवळी गावचे ५ वर्षे उपसरपंच होते. तसेच त्यांचे तासगाव आणि ढवळी येथे औषधांचे दुकानही होते. तसेच ते सांगली जिल्ह्याच्या केमिस्ट एन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे संचालक होते.
त्यांच्या अचानक मृत्यू झाल्याने ढवळी गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर शनिवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, आई आणि भाऊ असा परिवार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
SL vs ENG : पहिल्या कसोटीत इंग्लंडचा विजय दृष्टीक्षेपात, केवळ ३६ धावांची गरज
आत्तापर्यंत केवळ ३ भारतीय जोड्यांनाच जमलेला ‘तो’ विक्रम आता शार्दुल-सुंदरच्याही नावावर