भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेला दुखापतीचे ग्रहण लागलेले आहे. मालिकेतील चौथा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे सुरू असून सिडनी येथील सामन्यात खेळणारे तब्बल पाच खेळाडू या सामन्यात अंतिम 11 मध्ये नाहीत. या कसोटीसाठी भारताने आपल्या संघात चार तर ऑस्ट्रेलियाने एक बदल केलेला आहे.
भारतीय संघाकडून रवींद्र जडेजा, हनुमा विहारी, रविचंद्रन अश्विन व जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त असून त्यांच्या जागी वॉशिंग्टन सुंदर, मयंक अग्रवाल, शार्दुल ठाकूर व टी नटराजन यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर विल पुकोस्की देखील दुखापतीतून सावरला नसून त्याच्या जागी मार्कस हॅरीसचा संघात समावेश करण्यात आला आहे. मालिकेत दुखापतीची सर्वात जास्त झळ बसली ती भारतीय संघाला. या संपूर्ण मालिकेत चार कसोटी सामने खेळणारे अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा हे केवळ दोनच भारतीय खेळाडू आहेत. तर नऊ ऑस्ट्रेलियन खेळाडू या संपूर्ण मालिकेतील चार सामन्यात खेळले आहेत.
चारही सामने खेळलेल्या दोन्ही संघांच्या तंदुरुस्त खेळाडूंचा संघ बनवला असता त्यामध्ये खालील खेळाडूंचा समावेश होईल –
चेतेश्वर पुजारा
मार्नस लॅब्यूशेन
स्टीव्ह स्मिथ
अजिंक्य रहाणे
मॅथ्यू वेड
टीम पेन
कॅमेरॉन ग्रीन
पॅट कमिन्स
मिशेल स्टार्क
नॅथन लायन
जोश हेझलवूड
भारतीय संघाला दुखापतींचा फटका –
खेळाडूंना झालेल्या दुखापतीमुळे भारताने या मालिकेत तब्बल 19 वेगवेगळ्या खेळाडूंना खेळण्याची संधी दिलेली आहे. विशेष म्हणजे मागील बऱ्याच दशकांत भारताने इतक्या खेळाडूंना संधी दिलेली नव्हती. भारतीय संघाकडून या मालिकेत शुभमन गिल, मोहम्मद सिराज ,नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर व टी नटराजन अशा तब्बल 5 खेळाडूंनी कसोटी पदार्पण केलेले आहे.
विराट कोहलीची पालकत्व रजा व इतर खेळाडूंना झालेल्या दुखापतीनंतरही, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने मैदानावर संघर्ष केलेला आहे. 4 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या 3 सामन्यानंतर दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत असून, ब्रिस्बेन येथील सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाला मालिका विजयाची देखील संधी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ब्रिस्बेन कसोटी दरम्यान मॅथ्यू वेडची स्लेजिंग करणाऱ्या रिषभ पंतवर भडकले ‘हे’ दोन ऑस्ट्रेलियन दिग्गज
…म्हणून नॅथन लायनला चौथ्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाने दिला गार्ड ऑफ ऑनर
कारकिर्दीतील १८ वे शतक करत जो रुटने केला मोठा रेकॉर्ड, ‘या’ दिग्गजांच्या यादीत झाला सामील