भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही संघाच्या गोलंदाजांचा जलवा पाहायला मिळाला. प्रथम ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारतीय संघाला अवघ्या 150 धावांवर गुंडाळलं. यावेळी सामन्यात कांगारुंचं पारडं खूप भारी असल्याचं वाटत होतं. मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कमबॅक करवला आणि 67 धावांवर ऑस्ट्रेलियाचे 7 गडी बाद केले. या दरम्यान भारतीय गोलंदाजांनी एक मोठा रेकॉर्ड कायम केला.
वास्तविक, 1980 नंतर ही दुसरी वेळ आहे जेव्हा ऑस्ट्रेलियानं 40 धावांच्या आत पहिल्या पाच विकेट गमावल्या. यापूर्वी 2016 मध्ये होबार्टमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलियानं 17 धावांवर पाच विकेट गमावल्या होत्या. पर्थ येथे खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे सात गडी बाद झाले. विशेष म्हणजे, कांगारुंनी अवघ्या 38 धावांत पाच विकेट गमावल्या होत्या.
जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या जसप्रीत बुमराहनं दहा षटकांत 17 धावा देऊन 4 बळी घेतले. मोहम्मद सिराजनं नऊ षटकांत 17 धावा देत दोन बळी घेतले. तर पहिला सामना खेळणाऱ्या हर्षित राणानं आठ षटकांत 33 धावा देत एक बळी घेतला.
ऑस्ट्रेलियासाठी कसोटी पदार्पण करणारा नॅथन मॅकस्विनी (10) याला बुमराहनं पायचित केलं. उस्मान ख्वाजा (8) हाही बुमराहच्या गोलंदाजीत बाद झाला. भरवश्याचा मार्नस लाबुशेनही अवघ्या 2 धावा करू शकला. सध्या खराब फॉर्मशी झुंजत असलेला स्टार स्टीव्ह स्मिथ (0) पहिल्याच चेंडूवर पायचित झाला. बुमराहनं त्याची विकेट घेतली. तर मिडल स्टंपकडे जाणाऱ्या चेंडूवर हर्षित राणानं ट्रॅव्हिस हेडची (11) विकेट घेतली. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाच्या 38 धावांत 5 विकेट पडल्या.
हेही वाचा –
डेल स्टेननंतर अशी कामगिरी करणारा बुमराह केवळ दुसरा गोलंदाज! 10 वर्षांत हे प्रथमच घडलं
पर्थ कसोटीच्या पहिल्याच दिवशी 17 विकेट पडल्या! अखेरच्या सत्रात भारताचा जोरदार कमबॅक
ऑस्ट्रेलियात पारा चढतोय! सिराज-लाबुशेन एकमेकांशी भिडले, बाचाबाचीचा व्हिडिओ व्हायरल