मोहाली। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात रविवारी(10 मार्च) चौथा वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताला 4 विकेटने पराभूत व्हावे लागले आहे. त्यामुळे पाच सामन्यांच्या या मालिकेत 2-2 अशी बरोबरी ऑस्ट्रेलियाने साधली आहे. या सामन्यात नाबाद अर्धशतकी खेळी करणाऱ्या ऍश्टन टर्नरने विजयात मोलाचा वाटा उचलला.
कारकिर्दीतील दुसराच वनडे सामना खेळणाऱ्या टर्नरने या सामन्यात शेवटच्या काही षटकात आक्रमक फटकेबाजी करताना 6 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 43 चेंडूत नाबाद 84 धावा केल्या. त्यामुळे त्याने सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे.
त्यातच 23 मार्चपासून आयपीएलचा 12 वा मोसम सुरु होणार असल्याने टर्नरच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. त्याचा हा पहिलाच आयपीएल मोसम असून तो यावर्षी राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणार आहे. राजस्थान रॉयल्सने त्याला 50 लाख रुपयांची बोली लावत संघात सामील करुन घेतले आहे.
या आयपीएलमध्ये टर्नरची कामगिरी चांगली झाली तर त्याला 30 मे पासून सुरु होणाऱ्या विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून संधी दिली जाऊ शकते.
टर्नरने आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाकडून 5 टी20 सामनेही खेळले आहेत. मात्र यात त्याला 26 धावा करता आल्या आहेत आणि 3 विकेट्स घेता आल्या आहेत.
टर्नरचा जन्म 25 जानेवारी 1993 ला झाला असून तो फलंदाजी बरोबरच फिरकी गोलंदाजीही करतो. टर्नरने 2012-13 च्या मोसमात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केले. तसेच त्याला पर्थ स्कॉचर्सनेही करारबद्ध केले आहे.
त्याचबरोबर टर्नरने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे 15 वर्षांखालील, 17 वर्षांखालील आणि 19 वर्षांखालील संघाकडून प्रतिनिधित्व केले आहे. तसेच 17 वर्षांखालील संघाचे नेतृत्व करताना नॅशनल चॅम्पियनशिपचे विजेतेपदही मिळवले होते.
त्याचबरोबर सप्टेंबर-ऑक्टोबर 2011 मध्ये 19 वर्षांखालील ऑस्ट्रेलिया संघाबरोबर टर्नरने भारत दौराही केला आहे. त्यावेळी त्याने चौरंगी मालिकेत सहा सामन्यात 8 विकेट्स घेतल्या होत्या. त्या मालिकेत ऑस्ट्रेलिया, भारत, श्रीलंका आणि विंडीजचा 19 वर्षांखालील संघ सामील होते. तसेच त्याने 2012 ला झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात 6 सामन्यात 11 विकेट्स घेत सर्वांना प्रभावित केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
–टेलरने ज्या खेळाडूचा विक्रम मोडला त्याचीच मागितली माफी
–रिषभ पंतच्या त्या ३ चुका पहाच, ज्यामुळे कर्णधार कोहली चिडला
–आकाश अंबानीच्या लग्नात हार्दिक पंड्या-करण जोहरने धरला ठेका