भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आयपीएल २०२१ स्थगित करण्यात आली. खेळाडू कर्मचारी या आजाराच्या विळख्यात सापडल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सर्व देशाचे खेळाडू आपापल्या मायदेशी रवाना झाले. परंतु, ऑस्ट्रेलिया सरकारच्या नव्या नियमांमुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंना अजूनही सर्वसामान्य जीवन अनुभवता आले नाही.
या काळात खेळाडूंना तंदुरुस्तीचा प्रश्र्न उद्भवू नये म्हणून क्वारंटाईन असलेल्या हॉटेलमध्येच नव्या पद्धतीने व्यायाम करण्यास सुरुवात केली आहे. नुकताच याबाबत खुलासा ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार पॅट कमिन्स याने केला.
ऑस्ट्रेलियन खेळाडूंना सहन करावा लागला त्रास
आयपीएल २०२१ ही २९ सामन्यांनंतर ४ मे रोजी स्थगित करण्यात आली. इतर देशांचे खेळाडू तात्काळ मायदेशी रवाना झाले. परंतु, ऑस्ट्रेलियन सरकारने १५ मे पर्यंत भारतातून येणाऱ्या विमानांना बंदी घातल्याने ऑस्ट्रेलियन खेळाडूं पुढे पेच निर्माण झाला.
त्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू व कर्मचारी असे मिळून ३८ जण मालदीवमध्ये गेले. त्या ठिकाणी १२ दिवस घालवल्यानंतर हे सर्वजण १८ मे रोजी ऑस्ट्रेलियाला पोहोचले. मात्र, ऑस्ट्रेलियन सरकारच्या कडक नियमांमुळे या खेळाडूंना आणखी १४ दिवस सिडनी येथे हॉटेलमध्ये क्वारंटाईन करून ठेवले आहे.
खेळाडू असे राहतात तंदुरुस्त
एवढ्या मोठ्या कालावधीत राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना तंदुरुस्तीचा त्रास होऊ नये म्हणून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक शक्कल लढवली. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा उपकर्णधार पॅट कमिन्स याने सांगितले की, “खेळाडूंची तंदुरुस्ती रहावी व चेंडू फेकण्याची क्षमता कायम राहावी म्हणून आम्ही सध्या हॉटेल रूममधील टॉवेलचा वापर करत आहोत. राष्ट्रीय संघाच्या ट्रेनरने आम्हाला एक व्हिडिओ पाठवला. आम्हाला मिळणाऱ्या लहान किंवा मोठ्या टॉवेलला ९ गाठी मारल्यानंतर तो ऐका चेंडूप्रमाणे होतो. यामुळे आमची चेंडू फेकण्याची क्षमता तशीच राहते.”
पॅट कमिन्सने आयपीएल २०२१ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सचे प्रतिनिधित्व केले होते. गोलंदाजीत सरासरी कामगिरी केलेल्या कमिन्सने फलंदाजीत मात्र कमाल केली. त्यानंतर, भारतीय नागरिकांना कोरोना काळात मदत व्हावी म्हणून ३७ लाख रुपये देखील दान केले.
ऑस्ट्रेलिया खेळणार वेस्ट इंडिजविरुद्ध
ऑस्ट्रेलियन संघाला यानंतर ९ जूनपासून वेस्ट इंडिज विरुद्ध पाच सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. ऍरॉन फिंच या मालिकेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करेल. फिंच आयपीएलमध्ये कोणत्याही संघाचा भाग नव्हता.
महत्त्वाच्या बातम्या –
ऍडमिन असावा तर असा! आयपीएलच्या पुनरागमनानंतर राजस्थानने शेअर केला व्हिडिओ, हसून हसून व्हाल लोटपोट
विश्वचषकात सर्वाधिक धावा करत या ३ भारतीयांनी जिंकली होती ‘गोल्डन बॅट’
कमालच की! ‘या’ १० गोलंदाजांनी आपल्या संपूर्ण कारकीर्दीत कधीही टाकला नाही वाईड बॉल