कॅनबेरा येथील मनुका ओव्हल येथे बिग बॅश लीगच्या चॅलेंजर सामन्यात डकवर्थ-लुईस नियमाअंतर्गत पर्थ स्कॉर्चर्सने ब्रिस्बेन हिटचा ४९ धावांनी पराभव केला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. आता ६ फेब्रुवारीला पर्थचा संघ हा विजेतेपसाठी सिडनी सिक्सर्स सोबत भिडणार आहे.
चॅलेंजर्स सामन्यात ब्रिस्बेन हिटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या पर्थ स्कॉर्चर्सच्या कॅमरून ब्रेनक्राफ्ट आणि आणि लियाम लिव्हिंगस्टोन या सलामीवीर जोडीने ११४ धावांची भागीदार केली. लिव्हिंगस्टनने जोरदार फलंदाजी करत ३९ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकार ठोकत ७६ धावा केल्या. त्यानंतर तो बाद झाला. ब्रेनक्राफ्टने नंतर मिचेल मार्शसह ७५ धावांची भागीदारी केली. ब्रेनक्राफ्टने ४२ चेंडूत ६ चौकार ठोकत नाबाद ५८ तर मार्शने २८ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या सहायतेने ४९ धावा काढल्या.
पर्थ संघाची एकूण धावसंख्या १८.१ इतक्या ओव्हर मध्ये १८९-१ अशी होती, परंतु पावसामुळे हा सामना थांबवण्यात आला. त्यामुळे त्यांचा डाव पुन्हा सुरू होऊ शकला नाही आणि ब्रिस्बेन संघाला डकवर्थ-लुईस नियमाअंतर्गत १८ षटकांमध्ये २०० धावांचे लक्ष्य मिळाले.
पहिल्या विकेटसाठी ब्रिस्बेन संघाकडून कर्णधार ख्रिस लिनने २२ तर जो डेन्लीने १४ धावा केल्या. दोघांनी एकूण ३७ धावांची भागीदारी केली, तथापि पर्थच्या जेसन बेहरेंडार्फने आपल्या सलग दोन चेंडूवर विकेट घेत ब्रिस्बेनला मोठा झटका दिला. बघता बघता ब्रिस्बेनच्या संघाची धावसंख्या ६ बाद ८८ धावा अशी झाली होती. जो बर्न्सने २४ चेंडूत ३८ धावा केल्या, पण तो आपल्या संघाला जिंकवू शकला नाही. पर्थच्या धावसंख्येपर्यंत ब्रिस्बेन संघाला योग्य मजल मारता आली नाही. त्यांचा डाव १८ षटकांत ९ बाद १५० धावांवर संपला. त्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
लिव्हिंगस्टनला त्याच्या शानदार खेळीमुळे सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
आता ६ फेब्रुवारीला पर्थ आणि सिडनी संघात अंतिम सामना रंगेल. हा सामना सिडनी येथे होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘स्पायडरमॅन’ गेला बुमराहच्या डोक्यात! पंतने सोडलेला ‘तो’ कॅच बुमराह आयुष्यभर विसरणार नाही; कारण…
आजवर अनेकांच्या दांड्या गुल केल्या पण आजची ‘ही’ विकेट बुमराह कधीच विसरणार नाही; वाचा कारण