बीसीसीआयचा (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याने उद्या (3 मार्च) दुबई येथे होणाऱ्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत भाग घेणार नसल्याचे सांगितले आहे. त्याने हा निर्णय कोरोना वायरसच्या धोक्यामुळे घेतला आहे. त्याच्या या निर्णयानंतर ही बैठक स्थगित करण्यात आली. पुढे ही बैठक केव्हा होईल याचा निर्णय नंतर घेण्यात येणार आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांनी यासंदर्भातील माहिती पीटीआयला दिली. गांगुलीला या बैठकीत भाग घेण्यासाठी काल (1 मार्च) संध्याकाळी दुबईला निघायचे होते. पण, जगभरात कोरोनाचे सावट पसरल्यामुळे त्याने ही यात्रा पुढे ढकलली.
गांगुली व्यतिरिक्त बीसीसीआयचा सचिव जय शहा यालाही बैठकीत सहभागी व्हायचे होते. महत्त्वाचे म्हणजे, संयुक्त अरब देशामध्ये कोरोनाचे 730 केसेस समोर आल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
तत्पुर्वी, गांगुलीने शुक्रवारी सांगितले होते की, पुढचा आशियाई चषक दुबईमघ्ये खेळला जाणार आहे. यामध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ भाग घेणार आहेत. पहिल्यांदा ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार होती. पण, भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी नकार दिल्यामुळे ही स्पर्धा दुबईला हलविण्यात आली.