भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दोन सामन्यांचा टप्पा ओलांडत तिसऱ्या सामन्याच्या तयारीला लागले आहेत. प्रत्येकी एक सामना जिंकत हे दोन्ही संघ मालिकेत १-१ ने बरोबरीवर आहेत. त्यामुळे येत्या ७ जानेवारीपासून सिडनी येथे होणारा तिसरा कसोटी सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. नव्या वर्षाच्या नव्या जोशात भारतीय संघाने या सामन्यासाठी सराव सुरु केला आहे. बीसीसीआयने त्यांचा सरावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शेअर केलेल्या या व्हिडिओत भारतीय क्रिकेटपटू उत्साहाने सराव करताना दिसत आहेत. काही खेळाडू फलंदाजीचा सराव करत आहेत, तर काही गोलंदाजीचा. तसेच काही खेळाडू यष्टीरक्षणाचा सराव करत आहेत. दरम्यान मोठ्या जोशात ओरडू- ओरडू ते एकमेकांना सरावासाठी प्रोत्साहित करत आहेत.
बीसीसीआयने त्यांचा सराव करतानाचा व्हिडिओ शेअर करताना भन्नाट असे कॅप्शन दिले आहे. “नविन वर्षात. नवी उर्जा. तुम्हाला उत्स्फुर्त करण्यासाठी एवढा जोश पुरेसा आहे का?,” असे त्यांनी लिहिले आहे.
New Year. Renewed Energy.💪
How is that for josh?🔊💥#TeamIndia pic.twitter.com/PfKcXjkeK2
— BCCI (@BCCI) January 2, 2021
उमेश यादवच्या जागी टी नटराजनला संधी
विराट कोहली आणि मोहम्मद शमी यांच्याव्यतिरिक्त वेगवान गोलंदाज उमेश यादव हादेखील तिसऱ्या कसोटी सामन्याचा भाग नसणार आहे. मेलबर्न येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान गोलंदाजी करताना उमेशला दुखापत झाली होती. सामन्यानंतर केलेल्या चाचण्यांमध्ये उमेशची दुखापत गंभीर असल्याचे आढळून आले. त्यामुळे तो उर्वरित मालिकेला मुकणार आहे.
तसेच फेब्रुवारी महिन्यातील इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी तंदुरुस्त होण्यासाठी बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसन कार्यक्रमासाठी जाणार आहे. त्यामुळे उमेशच्या जागी युवा वेगवान गोलंदाज टी नटराजन याला संघात स्थान देण्यात आले आहे.
रोहित शर्मा असणार उपकर्णधार
याव्यतिरिक्त विस्फोटक फलंदाज रोहित शर्माचे संघासोबत जोडला गेला आहे. त्यामुळे उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी त्याला देण्यात आली आहे. याआधी भारताचा नियमित कर्णधार कोहली पालकत्व रजेमुळे माघारी परतल्याने संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत होता, तर उपकर्णधार चेतेश्वर पुजारा होता.
असा आहे तिसऱ्या कसोटी सामन्यातील भारतीय संघ-
अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), मयंक अगरवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धिमान साहा, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदिप यादव, रविंद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि टी नटराजन
महत्त्वाच्या बातम्या-
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बाबर आझमला मिळाला ‘हा’ मोठा पुरस्कार
याला म्हणतात प्रतिभा! केवळ १२ दिवसांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत हॅट्रिक घेणारा क्रिकेटर