आगामी काळात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये ऍशेस मालिका खेळली जाणार आहे. यापूर्वी चाहत्यांसाठी एक आनंदची बातमी समोर आली आहे. मागच्या काही काळापासून क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतलेल्या बेन स्टोक्सला या मालिकेसाठी इंग्लंड संघात सामील केले गेले आहे.
स्टोक्सला आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्या बोटाच्या दोन शस्त्रक्रिया झाल्या. त्यामुळे त्याला बराच काळ मैदानापासून दूर राहावे लागले होते. तसेच त्याने मानसिक आरोग्याच्या कारणाने देखील काही काळ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. पण आता तो खेळण्यासाठी फिट झाला आहे. त्याने मागच्या काही दिवसात सरावालाही सुरुवात केली आहे.
स्टोक्सने त्याच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी मागच्या काही काळापासून क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली होती. पण आता तो ऍशेस मालिकेत खेळताना दिसणार आहे. यावेळी स्टोक्स म्हणाला आहे की, त्याने त्याच्या मानसिक आरोग्याला प्राथमिकता देण्यासाठी विश्रांती घेतली होती आणि त्याने त्याच्या बोटाला बरे केले आहे. मी माझ्या सहकाऱ्यांना पाहण्यासाठी आणि त्यांच्यासोबत मैदानावर राहण्यासाठी उत्सुक आहे. मी ऑस्ट्रेलियासाठी तयार आहे.
दरम्यान, स्टोक्स त्याच्या दुखापतीमुळे आणि मानसिक आरोग्याच्या कारणास्तव भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या मायदेशातील कसोटी मालिकेत सहभागी होऊ शकला नव्हता. त्यानंतर आयपीएल २०२१ चा दुसरा टप्प्या आणि सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकातही तो सहभाग घेऊ शकला नाही.
मात्र, ४ ऑक्टोबरला झालेल्या त्याच्यो बोटाच्या दुसऱ्या शस्त्रक्रियेनंतर तो आता फिट झाल्याचे दिसत आहे. तो आता ऍशेस मालिकेसाठी ४ नोव्हेंबरला इग्लंड संघासोबत ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे.
इंग्लंड पुरुष क्रिकेट संघाचे मॅनेजिंग डायरेक्टर एश्ले जाइल्सने स्टोक्सविषयी बोलताना सांगितले की, बोटाच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर माझ्यात आणि स्टोक्समध्ये खूप चर्चा झाली. स्टोक्सने मला सांगितले की, तो क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्यासाठी तयार आहे आणि ऍशेस मालिका खेळण्यासाठी उत्सुक आहे.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये ऍशेज मालिका ८ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी स्टोक्सला सराव सत्रात गोलंदाजी करताना पाहिले गेले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
मुजीब-राशिदच्या फिरकीने उडवला स्कॉटलंडचा धुव्वा! अफगाणिस्तानचा १३० धावांनी एकतर्फी विजय
‘पाजी, टीव्ही फोडला नाही ना?’ हरभजन-अख्तरच्या वादात ‘या’ खेळाडूची उडी