भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव, बीसीसीआयने 9 मे रोजी चालू आयपीएल हंगामातील उर्वरित सामने स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आता एक मोठी बातमी आहे की दिल्ली क्रिकेट स्टेडियमला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. डीडीसीएला मेलद्वारे धमकी देण्यात आली आहे. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनला (DDCA) शुक्रवारी एक धमकीचा ईमेल मिळाला ज्यामध्ये भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानविरुद्ध चालवलेल्या ऑपरेशन सिंदूरचा बदला घेण्यासाठी नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.
डीडीसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, शुक्रवारी सकाळी अरुण जेटली स्टेडियमला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली होती आणि पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मेलमध्ये लिहिले आहे की, ‘तुमच्या स्टेडियममध्ये बॉम्बस्फोट होईल. आमच्याकडे भारतात सक्रिय पाकिस्तानचा एक समर्पित स्लीपर सेल आहे. हा ब्लास्ट ऑपरेशन सिंदूर साठीचा आमचा बदला असेल.’ या ठिकाणी आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या होम मॅचेसचे आयोजन करण्यात आले आहे.
सीमापार तणावामुळे बीसीसीआयने आयपीएल 2025 एका आठवड्यासाठी पुढे ढकलले आहे. अरुण जेटली स्टेडियमवर 11 मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध हंगामातील शेवटचा सामना होणार होता, परंतु बीसीसीआयच्या निर्णयानंतर तो आता पुढे ढकलण्यात आला आहे. 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांनाही ईमेलद्वारे जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या.